नवी दिल्ली : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर हायलो ओपन सुपर ५०० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने डेन्मार्कच्या जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या लिने होजमार्क क्येर्सफेल्डचा २१-१२, २१-१४ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. अवघ्या ३९ मिनिटांत तिने हा सामना जिंकला. या हंगामातील सिंधूचे हे दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी तिने जुलै महिन्यात जपान ओपनचे विजेतेपद मिळवले होते. तर गेल्या आठवड्यात फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
दुसरे मानांकन असलेल्या सिंधूने अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. क्रॉस कोर्टवरील अप्रतिम फटक्याने तिने गुणांचे खाते उघडले. मात्र, काही चुका झाल्याने लिनेने ३-३ अशी बरोबरी साधली. यानंतर सिंधूने आपल्या अचूक फटक्यांच्या जोरावर सामन्यावर पकड मिळवली. नेटजवळील चतुर खेळ आणि वेगवान स्मॅशच्या जोरावर तिने ८-५ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला सिंधू ११-८ अशी आघाडीवर होती. त्यानंतरही तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमनाची संधी दिली नाही. अप्रतिम बॅकहँड फटक्याने १७-१२ अशी आघाडी मिळवल्यानंतर सिंधूने पहिला गेम २१-१२ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्येही सिंधूचा दबदबा कायम राहिला. तिने ४-२ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूच्या कमकुवत फटक्यांचा फायदा उठवत आघाडी १०-६ अशी वाढवली. लिनेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र नेटजवळील खेळातील चुका तिच्यासाठी महागात पडल्या.
सिंधूने १७-११ अशी आघाडी मिळवल्यानंतर विजेतेपदापासून ती केवळ चार गुण दूर होती. अखेर आक्रमक परतीच्या फटक्याने तिने सहा मॅच पॉइंट मिळवले आणि प्रतिस्पर्धी खेळाडूच्या नेटवरील चुकीचा फायदा घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर सिंधूला ९२०० रँकिंग गुण मिळाले असून, वर्षअखेरीस होणाऱ्या वर्ल्ड टूर फायनल्ससाठी तिची वाटचाल अधिक मजबूत झाली आहे.
३१ नव्हे, २१ वर्षांची!
“प्रतिस्पर्धी कोण आहे, यापेक्षा माझे सर्वोत्तम प्रदर्शन करणे महत्त्वाचे होते. आम्ही यापूर्वी अनेकदा एकमेकींविरुद्ध खेळलो आहोत. मात्र, प्रत्येक गुणावर लक्ष केंद्रित करणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते.
मी सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि तिला संधीच दिली नाही,” असे सिंधू विजयानंतर म्हणाली. तसेच तिने ट्वीट करत ३१ वर्षांची असली, तरी या स्पर्धेतील यशामुळे जणू २१ वर्षांची झाली आहे, असे गमतीने म्हटले.