टेनिसपटू राफेल नदालचे संग्रहित छायाचित्र एक्स @India_AllSports
क्रीडा

लाल वादळ थंडावले...राफेल नदालने केली निवृत्तीची घोषणा, डेव्हिस चषक ठरणार अखेरची स्पर्धा

Swapnil S

माद्रिद: गेली २४ वर्षे तमाम क्रीडाप्रेमींच्या मनावर अविरत राज्य करणारे 'लाल वादळ' अखेर गुरुवारी थंडावले. कोणत्याही स्थितीत हार न मानण्याची जिद्द, चिकाटी आणि खडूस वृत्ती या त्रिसूत्रीच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्पेनचा तारांकित टेनिसपटू राफेल नदालने वयाच्या ३८ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. पुढील महिन्यात डेव्हिस चषक स्पर्धेत स्पेनकडून नदाल अखेरचा सामना खेळणार आहे.

'लाल मातीचा अनभिषिक्त सम्राट' म्हणजेच 'किंग ऑफ क्ले' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदालने गुरुवारी द्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली. तब्बल २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असलेला नदाल पॅरस ऑलिम्पिकमध्ये स्पेनसाठी अखेरचा खेळताना दिसला होता. वाढते वय व गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे नदालने अमेरिकन ओपनमधून माघार घेतली. आता पुढील महिन्यात स्पेनमध्येच डेव्हिस चषक होणार असल्याने त्या स्पर्धेत नदाल अखेरचा सामना खेळणार आहे.

"गेल्या काही वर्षाचा काळ माझी परीक्षा घेणारा ठरला. त्यामुळे अखेरीस मला हा निर्णय घेण्यावाचून पर्याय नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस चषकातील अंतिम लढतीद्वारे मी निवृत होणार आहे. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. मात्र हीच थांबण्याची योग्य वेळ आहे, असे नदाल म्हणाला. नदालने कारकीर्दीत विक्रमी १४ वेळा लाल मातीवर खेळवण्यात येणाऱ्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले. त्यामुळेच नदालला 'लाल मातीचा बादशहा' असे नाव पडले.

"टेनिस खेळण्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी माझ्याकडे जे आहे ते सर्व काही टेनिस तसेच देशासाठी देण्याचा प्रयत्न केला. सहकारी, फिजिओ व चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे इथवर मजल मारू शकली," असेही नदालने नमूद केले. या चित्रफीतीदरम्यान तो काहीसा भावूक झालेलाही दिसला.

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने २ वर्षांपूर्वी निवृत्ती जाहीर केल्यावर आता नदालही निवृत्त होत असल्याने टेनिस विश्वात पोकळी निर्माण होणार आहे. फेडरर, नदाल व जोकोव्हिच या त्रिमुर्तींमधील लढतींची जुगलबंदी चाहत्यांना आता पुन्हा पाहता येणार नाही, याची चाहत्यांना नेहमी खंत असेल. डावखुऱ्या नदालने गेल्या दोन दशकभराहून अधिक काळात टेनिसप्रेमींच्या हृदयात घर केल्यामुळेच त्याची निवृती पचवण्यासाठी सर्वांनाच काहीसा वेळ लागणार आहे.

झळाळती कारकीर्द

सुरुवात : २००१ (वय १५ वर्षे)

शेवट : २०२४ (वय ३८ वर्षे)

ग्रैंडस्लॅम जेतेपदे : २२

ऑलिम्पिक सुवर्णपदक : २(२००८, २०१६)

डेव्हिस चषक जेतेपद : ४ (२००४, २००९,

क्रमवारीत अग्रस्थान : २०९ आठवडे (एकंदर ५ वेळा)

अन्य विजेतेपदे : ९२ पटीपी, ३६ मास्टर्स स्पर्धा

सलग ५ वेळा आणि विक्रमी १४ वेळा फ्रेंच ऑपन जिंकणारा एकमेव टेनिसपटू.

आमनेसामने वि. जोकोव्हिच: ६० सामन्यांत २९ विजय, ३१ पराभवः

आमनेसामने वि. फेडरर :४० सामन्यांत २४ विजय, १६ पराभव

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे (पुरुष)

नोव्हाक जोकोव्हिच (सर्बिया) - २४

राफेल नदाल (स्पेन) - २२

रॉजर फेडरर ( स्वित्झर्लंड )- २०

नदालची २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे

ऑस्ट्रेलियन (२) : २००९, २०२२

फ्रेंच (१४) : २००५, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२२

विम्बल्डन (२) : २००८, २०१०

अमेरिकन (४) : २०१०, २०१३, २०१७, २०१९

अखेरचा 'टाटा' ! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

देशाचे अनमोल 'रतन' हरपले! टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेणारे नेतृत्व, एका क्लीकवर बघा सगळा प्रवास

Pune Porsche Car Accident: बाल न्याय मंडळाचे 'ते' दोन सदस्य बडतर्फ

शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला तूर्तास दिलासा; कारवाई करणार नसल्याची ED ची हायकोर्टात हमी

हरयाणात पक्षहितापेक्षा नेत्यांचे हितसंबंधच वरचढ ठरले; विश्लेषण बैठकीत राहुल गांधी यांचे परखड मत