क्रीडा

रहाणेचा सलग दुसरा भोपळा; दुबेचे अर्धशतकी पुनरागमन! मुंबईचा डाव पहिल्याच दिवशी २५१ धावांत संपुष्टात

राजस्थानविरुद्धच्या अ-गटातील तिसऱ्या साखळी सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव पहिल्याच दिवशी ५६.५ षटकांत १८९ धावांत आटोपला.

Swapnil S

थुंबा : नुकताच अफगाणिस्तानविरुद्ध मालिकावीर पुरस्कार पटकावणारा डावखुरा शिवम दुबे (७२ चेंडूंत ५१ धावा), सलामीवीर भुपेन लालवाणी (६३ चेंडूंत ५०) आणि तनुष कोटियन (१०५ चेंडूंत ५६) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेला सलग दुसऱ्यांदा भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत केरळविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पहिला डाव पहिल्या दिवशीच ७८.४ षटकांत २५१ धावांत संपुष्टात आला.

केरळमधील सेंट झेव्हियर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या ब-गटातील या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईचे जय बिस्ता (०) व रहाणे (०) हे दोघेही पहिल्याच दोन चेंडूंवर माघारी परतले. बसिल थम्पीने त्यांना बाद केले. रहाणे आंध्र प्रदेशविरुद्धही पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. सुवेद पारकर (१८) व प्रसाद पवार (२८) हेसुद्धा छाप पाडू शकले नाहीत. शिवमने मात्र ४ चौकार व २ षटकारांसह दमदार अर्धशतक झळकावले. भारतीय संघातून खेळल्यामुळे शिवम आंध्र प्रदेशविरुद्धच्या लढतीला मुकला. मात्र बिहारविरुद्ध त्याने ४१ धावा करतानाच गोलंदाजीतही छाप पाडली होती.

महाराष्ट्र १८९ धावांत गारद

राजस्थानविरुद्धच्या अ-गटातील तिसऱ्या साखळी सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव पहिल्याच दिवशी ५६.५ षटकांत १८९ धावांत आटोपला. कर्णधार केदार जाधव (४२) व निखील नाईक (४८) यांनी प्रतिकार केला. डावखुरा फिरकीपटू कुकना सिंगने ५, तर अराफत खानने ३ बळी पटकावले. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसअखेर राजस्थानने २ बाद ११० धावा केल्या असून ते अद्याप ७९ धावांनी पिछाडीवर आहेत. करण लांबा ४५, तर कर्णधार दीपक हुडा ३६ धावांवर खेळत आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस