मुंबई : अनुभवी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने अवघ्या १७ धावांत ५ बळी मिळवतानाच शानदार हॅटट्रिक साकारली. त्याच्या हॅटट्रिकपुढे चंदीगडच्या फलंदाजांची दैना उडाली. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ड-गटातील पहिल्या साखळी सामन्यात दुसऱ्या दिवशी चंदीगडला १९.१ षटकांत अवघ्या ७८ धावांत गुंडाळून तब्बल ३५१ धावांची आघाडी मिळवली. मुंबईने चंदीगडवर फॉलोऑन लादल्याने तिसऱ्याच दिवशी लढतीचा निकाल लागू शकतो.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर चंदीगडने दुसऱ्या डावात १ षटकात १ बाद शून्य धाव केली आहे. देशपांडेने दिवसातील अखेरच्या षटकात विशू कश्यपला त्रिफळाचीत केले. त्यामुळे अर्जुन आझाद व अर्सलन खान ही जोडी शून्यावर नाबाद असून मंगळवारी चंदीगडचे फलंदाज कितपत प्रतिकार करणार, हे पाहणे रंजक ठरेल. मुंबईने पहिल्या डावात ४२९ धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे त्यांना ३५१ धावांची मोठी आघाडी मिळाली. ५ बळी घेणाऱ्या देशपांडेला मोहित अवस्थीने ३, तर सेल्व्हेस्टर डीसोझाने २ बळी घेत उत्तम साथ दिली. मुंबईला या वेगवान त्रिकुटाव्यतिरिक्त अन्य गोलंदाजांची गरजच पडली नाही.
दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. प्रामुख्याने भारताच्या कसोटी संघातील स्थान टिकवण्यासह पुनरागमन करण्यास आतुर असलेल्या तारांकित खेळाडूंच्या कामगिरीकडे या स्पर्धेत विशेष लक्ष असेल. एलिट गटातील ३२ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
तत्पूर्वी, रविवारी पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४९ धावांपर्यंत मजल मारणाऱ्या मुंबईने सोमवारी चांगली सुरुवात केली. आदल्या दिवशी नाबाद ८० धावा करणाऱ्या कर्णधार सिद्धेश लाडने १९२ चेंडूंत ८६ धावा केल्या. शम्स मुलाणीने ३९ धावांची झुंज दिली, तर तनुष कोटियनने ५८ धावांचे योगदान दिले. मोहित अवस्थीने ११६ चेंडूंत नाबाद ५६ धावा केल्या. गोलंदाज देशपांडेने फलंदाजीतही चमक दाखवत ४७ चेंडूंत ४४ धावांची खेळी केली.
त्यानंतर चंदीगडच्या फलंदाजीची सुरुवातच खराब झाली. त्यांनी अवघ्या २९ धावांत आपले पहिले सहा गडी गमावले आणि त्यांचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत ७८ धावांवर बाद झाला. देशपांडेने ११व्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या चेंडूवर अनुक्रमे अर्जून, शिवम भांब्री व दिपेंदर कुश यांना बाद करून हॅटट्रिक मिळवली. निशुंक बिर्लाने ३३ धावांची एकाकी झुंज दिली. मोहितने त्याला बाद करून चंदीगडचा डाव संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १३६.५ षटकांत सर्व बाद ४२९ (सिद्धेश लाड ८६, मुशीर खान ६५; रोहित धांडा ४/७८)
चंदीगड (पहिला डाव) : १९.१ षटकांत सर्व बाद ७८ (निशुंक बिर्ला ३३; तुषार देशपांडे ५/१७, मोहित अवस्थी ३/९)
हे महत्त्वाचे
गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होईल. या काळात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. त्यानंतर २०२७मध्ये १७ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल. ९ फेब्रुवारीपासून उपांत्यपूर्व फेरी, १८ फेब्रुवारीपासून उपांत्य फेरी, तर २७ फेब्रुवारीपासून अंतिम सामना रंगेल. बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वीच जाहीर केलेल्या आदेशानुसार यंदाही वरिष्ठ खेळाडूंना शक्य असेल तेव्हा देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य असेल.