रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : शम्स, आकाश यांची अर्धशतके; मात्र रेल्वेचे मुंबईला चोख प्रत्युत्तर  छायाचित्र : सलमान अनसारी
क्रीडा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : शम्स, आकाश यांची अर्धशतके; मात्र रेल्वेचे मुंबईला चोख प्रत्युत्तर

रणजी करंडक स्पर्धेतील ड-गटातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने अखेरच्या सत्रात दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवत रेल्वे संघाला बॅकफूटवर ढकलले. दिवसअखेर रेल्वेने पहिल्या डावात २ बाद ११६ धावा केल्या असून ते अद्याप मुंबईच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा २८० धावांनी पिछाडीवर आहेत.

Swapnil S

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेतील ड-गटातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने अखेरच्या सत्रात दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवत रेल्वे संघाला बॅकफूटवर ढकलले. दिवसअखेर रेल्वेने पहिल्या डावात २ बाद ११६ धावा केल्या असून ते अद्याप मुंबईच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा २८० धावांनी पिछाडीवर आहेत. तत्पूर्वी, मंगळवारी पहिल्या सत्रात शम्स मुलाणी (१५३ चेंडूंत ७१ धावा) आणि आकाश आनंद (७१ चेंडूंत ५२) यांनी अर्धशतके साकारून मुंबईला ३९६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईच्या तनुष कोटियन (१/१२) आणि शम्स मुलाणी (१/२९) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत संघाला महत्त्वाचे यश मिळवून दिले. खेळपट्टी संथ असून काही वेळा चेंडूच्या उसळीत अनिश्चितता दिसत आहे. याचाच फायदा मुंबईच्या गोलंदाजांनी घेतला. रेल्वेकडून सलामीवीर विवेक सिंहने ५० चेंडूंत आठ चौकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. मात्र, मोहित अवस्थीच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर बचाव करण्याचा प्रयत्न करताना चेंडू पाठीवर आदळल्याने त्याला दुखापत झाली आणि मैदान सोडावे लागले. नवीन चेंडूचा अपेक्षित फायदा न मिळाल्याने मुंबईच्या गोलंदाजांना वेगवेगळ्या रणनीतींचा वापर करावा लागला. मात्र, रेल्वेच्या फलंदाजांनी सुरुवातीची २५ षटके संयमाने खेळून काढली.

२६व्या षटकात तनुष कोटियनने साहब सिंहला (३३) यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शम्स मुलाणीने इशान गोयलला पुढे येऊन खेळण्यास प्रवृत्त केले. मात्र, त्याचा फटका फसल्याने अतिरिक्त कव्हरवर उभ्या असलेल्या सिद्धेश लाडने सोपा झेल टिपला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार भार्गव मेराई ७ आणि मोहम्मद सैफ २९ धावांवर नाबाद होते.

दिवसाच्या सुरुवातीला मुंबईने पहिल्या डावातील धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. पहिल्या दिवसअखेर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात प्रत्येकी तीन गडी गमावल्यामुळे मुंबईची अवस्था ६ बाद २४७ अशी झाली होती. दुसऱ्या दिवशी उर्वरित चार फलंदाजांनी आणखी १४९ धावांची भर घातली. यात शम्स मुलाणीचे योगदान सर्वाधिक महत्त्वाचे ठरले. डावखुऱ्या मुलाणीने १५३ चेंडूंत सात चौकारांसह ७१ धावांची संयमी खेळी केली. त्याने यष्टिरक्षक फलंदाज आकाश आनंदसोबत सातव्या विकेटसाठी ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आकाशने ७१ चेंडूंत ५२ धावा केल्या.

अक्षयच्या शतकामुळे विदर्भला आघाडी

नागपूर : कर्णधार अक्षय वाडकरने २१२ चेंडूंत १०० धावांची खेळी साकारली. त्यामुळे विदर्भाने अ-गटात मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली. मध्य प्रदेशच्या २०९ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाची एकवेळ ४ बाद ३५ अशी स्थिती होती. मात्र अक्षय व नचिकेत भुते (९७) यांनी सातव्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे विदर्भाने ३३४ धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशने दुसऱ्या डावात १ बाद १९ धावा केल्या असून ते अद्याप १०६ धावांनी पिछाडीवर आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच

Mumbai : नुकसानभरपाई मालक व भाडेकरूमध्ये समान वाटून घ्या! सिद्धिविनायक मंदिर जमीन भरपाईप्रकरणी आदेश

...तर निवडणुका घ्यायच्याच कशाला? 'गोकुळ' अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांचा संताप