Ranji Trophy : सिद्धेश लाडने डाव सावरला; रणजी करंडक स्पर्धेत मुंबईची चंदीगडविरुद्ध सावध सुरुवात (Photo-X)
क्रीडा

Ranji Trophy : सिद्धेश लाडने डाव सावरला; रणजी करंडक स्पर्धेत मुंबईची चंदीगडविरुद्ध सावध सुरुवात

कर्णधार सिद्धेश लाडच्या नाबाद ८० धावा आणि मुशीर खानच्या संयमी ६५ धावांच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील चंदीगडविरुद्धच्या पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४९ धावा उभारल्या.

Swapnil S

मुंबई : कर्णधार सिद्धेश लाडच्या नाबाद ८० धावा आणि मुशीर खानच्या संयमी ६५ धावांच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील चंदीगडविरुद्धच्या पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४९ धावा उभारल्या. मुंबईला सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्यानंतर सिद्धेश लाड आणि मुशीर यांनी मुंबईला घरच्या मैदानावर सावरले.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला सुरुवात झाली असून ४२ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईचा पहिलाच सामना वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. चंदीगडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या फलंदाजांना सुरुवातीला अडचणीत आणण्यात चंदीगडच्या गोलंदाजांना यश आले; मात्र लाडने डाव सावरला.

भारताचा कसोटी सलामीवीर यशस्वी जैस्वालला खातेही उघडता आले नाही. जगजीत सिंगच्या गोलंदाजीवर शिवम भांबरीकडे झेल देऊन तो तिसऱ्याच षटकांत १३ चेंडूंत शून्यावर बाद झाला. त्यामुळे मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली.

यानंतर आयुष म्हात्रे आणि मुशीर खान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी करत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उपकर्णधारपदाची जबाबदारी आलेल्या आयुष म्हात्रेने ८२ चेंडूंत ४८ धावा केल्या. त्याच्या खेळीत सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र, रोहित धांडाने त्याला त्रिफळाचीत करून ही भागीदारी मोडली. मुशीर खानने आपल्या पारंपरिक शैलीपेक्षा वेगळी, मात्र प्रभावी बचावात्मक फलंदाजी करत चंदीगडच्या गोलंदाजांना बराच वेळ रोखून धरले. मुंबईच्या डावाचा पाया रचण्यात मुशीर आणि आयुष म्हात्रे यांची भागीदारी महत्त्वाची ठरली. मात्र, अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेल्या म्हात्रेला रोहित धांडाच्या चेंडूने मिळालेल्या सीम मूव्हमेंटचा अंदाज आला नाही आणि तो बाद झाला.

दुसऱ्या सत्रात सिद्धेश लाड आणि मुशीर यांनी बहुतांश वेळ अत्यंत सावध फलंदाजी केली. मात्र, सत्राच्या अखेरीस धांडाने सलग दोन महत्त्वाचे बळी मिळवत मुंबईला धक्के दिले. ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात मुशीर यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. मुशीरने संयमी फलंदाजी करत १४९ चेंडूंत ६५ धावा केल्या. त्यानंतर मुशीरचा मोठा भाऊ सर्फराज खान आत वळणाऱ्या चेंडूवर फटका न खेळता उभा राहिला; मात्र चेंडू पॅडवर आदळल्याने पंचांनी त्याला पायचीत बाद घोषित केले.

मुंबईची चार बाद १४४ अशी स्थिती झाल्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज आकाश आनंदने काही काळ लाडला साथ दिली. मात्र, अखेरच्या सत्रात चेंडूला वळण मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाज निशुंक बिर्लाने त्याला बाद केले.

चंदीगडकडून रोहित धांडाने ४४ धावांत तीन बळी घेतले, तर जगजीत सिंग आणि निशुंक बिर्ला यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी लाड आणि मुलानी यांच्यावर असेल.

लाडच्या ५ हजार धावा

लाडने १७६ चेंडूंत आठ चौकारांसह नाबाद ८० धावा केल्या. मुलानीने आक्रमक फलंदाजी करत २७ धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ६५ धावांची भागीदारी केली. लाडने या खेळीदरम्यान मुंबईकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पाही पार केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

भ्रष्ट कारभाराने निसर्गाची कत्तल; ठाणेकर उकाड्यात, यंत्रणा एसीत सुस्त; पारा ३८ अंशांवर, मध्यरात्रीही उष्णतेचा तडाखा

Mumbai : कमी कालावधीच्या सिग्नलमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून ४,११७ कोटींची कमाई

Mumbai : ‘पार्टिसिपेट मुंबई’मुळे पालिकेला फायदा होणार का?