RCB wins IPL 2026 : अंतिम फेरीत गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून वर्चस्व; विराटची शानदार अर्धशतकी खेळी X (RCB)
क्रीडा

RCB wins IPL 2026 : अंतिम फेरीत गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून वर्चस्व; विराटची शानदार अर्धशतकी खेळी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जेतेपद काबिज केले. गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम माऱ्याला विराट कोहलीच्या (४२ चेंडूंत नाबाद ७५ धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे बंगळुरूने गुजरात टायटन्सला ५ गडी व १२ चेंडू राखून पराभूत केले.

Swapnil S

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जेतेपद काबिज केले. गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम माऱ्याला विराट कोहलीच्या (४२ चेंडूंत नाबाद ७५ धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे बंगळुरूने गुजरात टायटन्सला ५ गडी व १२ चेंडू राखून पराभूत केले.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळुरूने २०२५मध्ये पंजाबला नमवून ही स्पर्धा प्रथम जिंकली होती. यंदा गुजरातला हरवून त्यांनी दुसऱ्यांदा हा खिताब पटकावला. आयपीएलमध्ये सलग दोन वेळा जेतेपद मिळवणारा बंगळुरू हा तिसरा संघ ठरला. २०१० व २०११मध्ये चेन्नईने, तर २०१९ व २०२०मध्ये मुंबईने हा पराक्रम केला होता. बंगळुरूचे हे एकंदर दुसरेच जेतेपद ठरले. गुजरातला मात्र दुसऱ्या जेतेपदाने हुलकावणी दिली. २०२२च्या विजेत्या गुजरातला २०२३ व २०२६मध्ये अंतिम फेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे महिलांची व पुरुषांच्या आयपीएलचे एकाच वर्षात जेतेपद मिळवणारा बंगळुरू हा पहिला संघ ठरला आहे.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत फक्त ८ बाद १५५ धावा केल्या. भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूड यांच्यापुढे गुजरातची फलंदाजी ढेपाळली. कर्णधार शुभमन गिल (१०), साई सुदर्शन (१२), जोस बटलर (१९) यांनी निराशा केली. त्यानंतर रसिक दरने ३ बळी मिळवले. वॉशिंग्टन सुंदरने ३७ चेंडूंत नाबाद ५० धावांची झुंज दिली. मात्र तरीही ते आव्हान बंगळुरूपुढे कमी ठरले.

बंगळुरूकडून विराटने २५ चेंडूंतच अर्धशतक साकारले. वेंकटेश अय्यर (१६ चेंडूंत ३२), टिम डेव्हिड (१७ चेंडूंत २४) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यामुळे विकेटा जाऊनही बंगळुरूने १८ षटकांत विजय मिळवला. विराटनेच अर्शद खानला षटकार लगावून बंगळुरूच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. https://x.com/RCBTweets/status/2061259157819539765?s=20

रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळुरूने यंदादेखील जेतेपदाच्या प्रबळ दावेदारासारखा खेळ करताना साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. १४ सामन्यांतील ९ विजय व सर्वोत्तम नेटरनरेटच्या बळावर त्यांनी अग्रस्थानासह आगेकूच केली होती. मग क्वालिफायर-१मध्ये गुजरातला त्यांनी धूळ चारली. तसेच उभय संघांत आतापर्यंत ९ सामने झाले होते. त्यांपैकी बंगळुरूने ५, तर गुजरातनेदेखील ४ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये नेहमीच कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. रविवारी गुजरात पलटवार करेल, असे वाटत होते. मात्र बंगळुरूने बाजी मारली.

वेंकटेश, देवदत्त पडिक्कल, भुवनेश्वर, हेझलवूड, कृणाल पंड्या, पाटीदार व तारांकित विराट यांची कामगिरी बंगळुरूसाठी पूर्ण हंगामात दमदार ठरली. आता पुढील वर्षी बंगळुरूला सलग तिसरे जेतेपद खु‌णावत असेल. पहिली १७ वर्षे जेतेपदासाठी प्रतीक्षा केल्यानंतर बंगळुरूने गेल्या २ वर्षांत जेतेपद मिळवून स्वप्ने पूर्ण होत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

मान्सूनचे आगमन लांबले; १० जूननंतर येणार पाऊस; पेरणीची घाई न करण्याचे आवाहन

जून महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य,१ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Environment Day 2026 : घरासाठी बेस्ट इनडोअर प्लांट्स; हवा राहील फ्रेश

Breakfast Recipe : सकाळच्या घाईत नाश्ता स्किप करू नका; ५ मिनिटांत तयार करा ही पौष्टिक स्मूदी