रोहितच्या शतकानंतरही भारताच्या पदरी निराशा; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासह इंग्लंडचा मालिकेवर कब्जा (Photo- X)
क्रीडा

रोहितच्या शतकानंतरही भारताच्या पदरी निराशा; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासह इंग्लंडचा मालिकेवर कब्जा

अनुभवी रोहित शर्माने ११० चेंडूंत १३८ धावांची जिगरबाज शतकी खेळी साकारून टीकाकारांची तोंडे बंद केली.

Swapnil S

लंडन : अनुभवी रोहित शर्माने ११० चेंडूंत १३८ धावांची जिगरबाज शतकी खेळी साकारून टीकाकारांची तोंडे बंद केली. तसेच निवृत्तीच्या अफवांनाही धुडकावून लावले. मात्र रोहितच्या शतकानंतरही भारताच्या पदरी निराशा पडली. कारण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताला २७ धावांनी पराभूत करत मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

३८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितचे शतक तसेच शुभमन गिल (७७) आणि विराट कोहली (७४) यांच्या अर्धशतकांनंतरही भारतीय संघाला ५० षटकांत ७ बाद ३६० धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून बेन डकेटने कारकिर्दीतील सर्वोत्तम १४२ धावांची खेळी साकारली, तर जेकब बेथेलने ९१ धावांची खेळी केली. तसेच जॉस बटलरने १३ चेंडूत ४१ धावांची धडाकेबाज खेळी केल्याने इंग्लंडने अखेरच्या ५ षटकांत ८२ धावा कुटल्या. भारताकडून प्रसिध कृष्णाने ६९ धावांत २ बळी मिळवले.

जसप्रीत बुमराच्या डाव्या पायाच्या दुखापतीमुळे अनुपस्थितीत चार वेगवान गोलंदाजांची रणनीती भारतीय संघासाठी अपयशी ठरली. धावांचा पाठलाग करताना रोहितने कर्णधार शुभमन गिलसोबत १४७ धावांची, तर विराट कोहलीसोबत ११३ धावांची भागीदारी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. रोहितने ११० चेंडूंत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने आपले ३४वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. लॉर्ड्सवर एकदिवसीय शतक झळकवणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. या लढतीपूर्वी रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. रोहितचा हा अखेरचा सामना ठरेल, असेही काहींनी म्हटले. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. रोहित शतकी खेळी साकारल्यावर बाद झाला व भारताचा डाव घसरला.

मोक्याच्या क्षणी सॅम करनने १० षटकांत ७५ धावा देत ४ बळी घेतले. करनने ईशान किशन, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांना सलग बाद करत भारताच्या आशा संपुष्टात आणल्या. त्याला जेकब बेथेलने ४९ धावांत १ बळी घेत चांगली साथ दिली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी