मुंबई : ऑक्टोबर २०२७चा एकदिवसीय विश्वचषक अजून खूप दूर आहे, असे वक्तव्य भारताचा तारांकित क्रिकेटपटू रोहित शर्माने गुरुवारी केले. आगामी विश्वचषकात खेळण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने ही एका ओळीची प्रतिक्रिया दिली. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहितच्या भवितव्याबद्दल आणि विश्वचषकातील सहभागाबद्दल तर्कवितर्क लावले जात असताना त्याने हे विधान केले.
मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमधील एका सदस्याने २०२७च्या विश्वचषकातील सहभागाबाबत विचारले असता, “ऑक्टोबर २०२७ अजून खूप दूर आहे, तेव्हाचे तेव्हा पाहू,” असे रोहित म्हणाला. २०२७चा एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका येथे पार पडणार आहे. याशिवाय, २०२४ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत जशी बसमधून मिरवणूक काढण्यात आली होती, तशीच पुन्हा जिंकल्यास काढली जाईल का, असा प्रश्न विचारला असता, “आता पुन्हा तशी विजयी मिरवणूक शक्य होईल, असे मला वाटत नाही,” असे उत्तर रोहितने दिले.
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवाजीत सैकिया यांनी रोहितच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.