भारताच्या धुरंधरांचा शतकी धडाका; रोहित, विराटचे विजय हजारे स्पर्धेत शानदार पुनरागमन; मुंबई, दिल्लीची दमदार सलामी 
क्रीडा

भारताच्या धुरंधरांचा शतकी धडाका; रोहित, विराटचे विजय हजारे स्पर्धेत शानदार पुनरागमन; मुंबई, दिल्लीची दमदार सलामी

विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पहिल्याच दिवशी भारताच्या धुरंधरांचा शतकी धडाका पाहायला मिळाला. रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित फलंदाजांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार शतकी पुनरागमन केले.

Swapnil S

जयपूर : विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पहिल्याच दिवशी भारताच्या धुरंधरांचा शतकी धडाका पाहायला मिळाला. रोहित शर्मा (९४ चेंडूंत १५५ धावा) आणि विराट कोहली (१०१ चेंडूंत १३१ धावा) या तारांकित फलंदाजांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार शतकी पुनरागमन केले. त्यामुळे त्यांचे संघ म्हणजेच अनुक्रमे मुंबई व दिल्ली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत विजय मिळवले.

२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेच्या ३३व्या हंगामाला प्रारंभ झाला. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. २०२४-२५च्या हंगामात कर्नाटकने अंतिम फेरीत विदर्भाला नमवून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. याबरोबरच त्यांनी सर्वाधिक वेळा विजय हजारे स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याच्या यादीत तमिळनाडूसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले.

बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे. काही महिन्यांपूर्वी विराट, रोहित रणजी स्पर्धेतही खेळताना दिसले होते. मात्र आता ते दोघेही टी-२० व कसोटीतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रणजी व मुश्ताक अली स्पर्धेत खेळणे त्यांना बंधनकारक नसेल. मात्र विजय हजारे स्पर्धेत खेळून ते लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने दोघांनाही संघात टिकून राहायचे आहे. तसेच दोघेही सध्या उत्तम लयीत असल्याचे आफ्रिका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिसून आले.

यंदा ३८ वर्षीय रोहित व ३७ वर्षीय विराट हे दोघेही बऱ्याच कालावधीनंतर विजय हजारे स्पर्धेत सहभागी झाल्याने त्यांच्या समावेशाविषयी उत्सुकता होती. रोहित ७ वर्षांनी, तर विराट तब्बल १५ वर्षांनी या स्पर्धेत सहभागी झाला आहे. दोन्ही खेळाडू आपापल्या संघासाठी पहिले दोन सामने खेळणार आहेत. मुंबईचे सर्व सामने जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर होत असून येथे प्रेक्षकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे विराटचा दिल्ली संघ बंगळुरूत प्रेक्षकांच्या विना बंदिस्त स्टेडियममध्ये खेळत आहे. ११ जानेवारीपासून भारताची न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे दोघेही त्यापूर्वी या स्पर्धेत खेळून लय टिकवणार आहे.

दरम्यान, क-गटातील सलामीच्या सामन्यात शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने सिक्कीमचा ८ गडी व ११७ चेंडू राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना सिक्कीमने ५० षटकांत ७ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली. आशिष थापाने ७९ धावांची खेळी साकारली. मुंबईकडून शार्दूलने १९ धावांत २ बळी मिळवले. मग लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमण करत लढत एकतर्फी केली.

रोहितने १८ चौकार व ९ षटकारांसह १५५ धावा फटकावल्या. त्याने ६२ चेंडूंतच शतकाची वेस ओलांडली. त्याचे हे लिस्ट-ए कारकीर्दीतील ३७वे शतक ठरले. रोहित व अंक्रिश रघुवंशी (३८) यांनी १९ षटकांत १४१ धावांची सलामी नोंदवली. अंक्रिश बाद झाल्यावर रोहितने मुशीर खानच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भर घातली. अखेरीस ३०व्या षटकात मुंबईला जिंकण्यासाठी अवघ्या १० धावा शिल्लक असताना रोहित बाद झाला. मग मुशीर (नाबाद २७) व सर्फराझ (नाबाद ८) या खान बंधूंनी ३०.३ षटकांत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह मुंबईने क-गटात अग्रस्थान मिळवले असून त्यांची २६ तारखेला उत्तराखंडशी गाठ पडेल.

ड-गटात ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने आंध्र प्रदेशला ४ गडी व ७४ चेंडू राखून नेस्तनाबूत केले. बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीतील मैदानात झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशने ५० षटकांत ८ बाद २९८ अशी दमदार धावसंख्या उभारली. रिकी भुईने १०५ चेंडूतं १२२ धावा केल्या, तर दिल्लीकडून वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंगने ५ बळी मिळवले.

मग दिल्लीने २९९ धावांचे लक्ष्य ३७.४ षटकांत सहज गाठून शानदार सलामी नोंदवली. अर्पित राणा (०) पहिल्याच षटकात बाद झाल्यावर विराटचे आगमन झाले. त्याने १४ चौकार व ३ षटकारांसह ८३ चेंडूंतच शतक पूर्ण केले. प्रियांश आर्याने ७४, तर नितीश राणाने ७७ धावा फटकावून विराटला उत्तम साथ दिली. विराटने प्रियांशसह दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची, तर राणासह तिसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी रचली. विराट बाद झाल्यावर पंत (५) छाप पाडू शकला नाही. मात्र दिल्लीने ३८व्या षटकात विजयीरेषा ओलांडली. सिमरजीतला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दिल्ली गटात अग्रस्थानी असून आता शुक्रवारी त्यांच्यासमोर गुजरातचे आव्हान असेल.

महाराष्ट्राला क-गटात पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. पंजाबने ५० षटकांत ६ बाद ३४७ धावा केल्या. नमन धीरने ९७, तर अनमोलप्रीत सिंगने ८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात महाराष्ट्राचा संघ ५० षटकांत ८ बाद २९६ धावांपर्यंतच पोहचू शकला. ब-गटात बंगालने विदर्भाला नमवले. ध्रुव शोरे व अमन मोखाडे यांच्या शतकांमुळे विदर्भाने ५० षटकांत ५ बाद ३८२ धावसंख्या उभारली. मात्र अभिमन्यू ईश्वरन, अभिषेक पोरेल यांच्या अर्धशतकांमुळे बंगालने ४८.५ षटकांत हे मोठे लक्ष्य गाठले.

विराटची सचिनवर सरशी; रोहितची वॉर्नरशी बरोबरी

आपल्या शतकी खेळीदरम्यान अपेक्षेप्रमाणे विराट, रोहित यांनी काही विक्रम मोडले, तर काही नवे प्रस्थापित केले. विराटने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये (५० षटकांचे सामने) सर्वात जलद १६ हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळवताना सचिन तेंडुलकरवर सरशी साधली. सचिनने ३९१ सामन्यांत १६ हजार धावा पूर्ण केल्या होत्या, तर विराटने ३३०व्या सामन्यात हा पराक्रम केला. तसेच लिस्ट-ए प्रकारात सर्वात जलद १ हजार ते १० हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे.

दुसरीकडे रोहितने लिस्ट-ए प्रकारात सर्वाधिक वेळा दीडशतकी खेळी साकारणाऱ्यांच्या यादीत वॉर्नरसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले. दोघांनीही प्रत्येकी ९ वेळा एकदिवसीय प्रकारात १५० किंवा त्याहून अधिक धावसंख्या उभारली आहे. तसेच या स्पर्धेत शतक झळकावणारा रोहित हा दुसरा वयस्कर खेळाडू ठरला. रोहितचे सध्याचे वय ३८ वर्षे २३८ दिवस आहे. बंगालच्या अनुस्तुप मजुमदारने ३९व्या वर्षी विजय हजारे स्पर्धेत शतक साकारले होते.

Thane : निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला धक्का; ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

Nashik : महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश; देवयानी फरांदे म्हणाल्या, "काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, "तुम्हाला आनंद दिघेंची शपथ...

Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...