बंगळुरू : तारांकित फलंदाजांचा भरणा असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १६ वर्षांत एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही. यामागील कारण देत भारताचा माजी क्रिकेटपटू तसेच समालोचक अंबाती रायुडूने बंगळुरूच्या आघाडीच्या तसेच अनुभवी फलंदाजांनाच दोषित धरले.
बंगळुरूला मंगळवारी लखनऊकडून २८ धावांनी पराभव पत्करावा लागला. हा त्यांचा चार सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फॅफ डू प्लेसिस असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फलंदाज बंगळुरूकडे आहेत. मात्र तरीही हा संघ संघर्ष करत आहे. यापूर्वी विराट, एबी डीव्हिलियर्स, ख्रिस गेल, के. एल. राहुल असे धडाकेबाज फलंदाज असूनही बंगळुरूला जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली.
“दडपणाच्या स्थितीत बंगळुरूची आघाडीची फळी ढेपाळते. त्यामुळे पाचव्या ते सातव्या क्रमांकावरील फारसा अनुभव नसलेल्या खेळाडूंवर बंगळुरूचा संघ अवलंबून असतो. यंदाच्या हंगामातही अनुज रावत, महिपाल लोमरोर या युवांसह दिनेश कार्तिक बंगळुरूसाठी दडपणात धावा करत आहेत. मात्र आघाडीच्या तीन ते चार फलंदाजांपैकी एखादा १५ ते १७ षटकांपर्यंत खेळपट्टीवर टिकल्यास बंगळुरूला अडचण येणार नाही,” असे रायुडू म्हणाला.