केप टाऊन : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी रंगतदार वळणावर आहे. रायन रिकल्टन व वियान मल्डर यांनी झळकावलेल्या शतकांमुळे आफ्रिकेने कांगारूंपुढे विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
उभय संघांतील मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. पहिल्या डावात आफ्रिकेला ३२९ धावांत गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाने ४२९ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात आफ्रिकेने एकवेळ बिनबाद १५८ अशी सुरुवात केली होती. मात्र स्टार्कने ६ बळी मिळवून त्यांना रोखले. त्यानंतर कांगारूंकडून इंग्लिससह कॅरी व कॅमेरून ग्रीन यांनी अर्धशतके साकारली. त्यामुळे त्यांनी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १०० धावांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात आफ्रिकेने ४ बाद १३० अशा स्थितीतून सर्व बाद ३८७ धावा केल्या. त्यामुळे आता शनिवारी पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य असेल.