क्रीडा

सचिनला अवघ्या दोन धावांनी शतकाची हुलकावणी; अंतिम सामन्यात केरळचा पहिला डाव ३४२ धावांत गारद

केरळचा कर्णधार सचिन बेबीला (२३५ चेंडूंत ९८ धावा) शतकाने अवघ्या दोन धावांनी हुलकावणी दिली.

Swapnil S

नागपूर : केरळचा कर्णधार सचिन बेबीला (२३५ चेंडूंत ९८ धावा) शतकाने अवघ्या दोन धावांनी हुलकावणी दिली. त्यानंतर हर्ष दुबे (८८ धावांत ३ बळी) आणि पार्थ रेखाडे (६५ धावांत ३ बळी) या डावखुऱ्या फिरकीपटूंपुढे केरळचा डाव घसरला. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात ३७ धावांची निर्णायक आघाडी घेतली.

नागपूर, जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या अंतिम लढतीत विदर्भाच्या ३७९ धावांच्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसअखेर केरळचा पहिला डाव १२५ षटकांत ३४२ धावांत संपुष्टात आला. लढतीचे अद्याप दोन दिवस शिल्लक असून आता शनिवारी चौथ्या दिवशी विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी करणार की पहिल्या डावातील आघाडीवरच समाधान मानून संथगतीने खेळणार, हे पाहणे रंजक ठरेल. केरळच्या गोलंदाजांचाही शनिवारी कस लागेल.

ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या रणजी स्पर्धेचा ९०वा हंगाम आता अंतिम लढतीच्या टप्प्यात आहे. एकीकडे विदर्भाला तिसऱ्यांदा, तर केरळला प्रथमच विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. अक्षय वाडकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भाने उपांत्य फेरीत मुंबईला धूळ चारून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे यंदा घरच्या मैदानात जेतेपद मिळवण्याचे विदर्भाचे लक्ष्य असेल. विदर्भाने यापूर्वी २०१७-१८, २०१८-१९ या हंगामांत रणजी स्पर्धा जिंकली होती. दुसरीकडे केरळने उपांत्य फेरीत गुजरातला पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर नमवून प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित असल्याने विजेता कोण ठरणार, याकडे लक्ष लागून आहे.

तत्पूर्वी, गुरुवारच्या ३ बाद १३१ धावांवरून पुढे खेळताना आदित्य सरवटे आणि सचिन यांनी तिसऱ्या दिवसाला उत्तम प्रारंभ केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या आदित्यने १० चौकारांसह ७९ धावा केल्या. अखेर स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या हर्षने आदित्यचा अडसर दूर करून ही जोडी फोडली. त्यानंतर सलमान निझार (२१), मोहम्मद अझरुद्दीन (३४) यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलता आला नाही.

मात्र सचिनने हंगामातील पाचवे अर्धशतक साकारताना १० चौकारांसह केरळला तारले. त्याने सलमानसह पाचव्या विकेटसाठी ४९, तर अझरुद्दीनसह सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भर घातली. जलज सक्सेनाने २८ धावांचे योगदान दिले. अखेर पार्थने १०७व्या षटकात सचिनला झेलबाद करून विदर्भाला मोठे यश मिळवून दिले. सचिन बाद झाला तेव्हा केरळच्या ३२४ धावा होत्या. मात्र उर्वरित ३ फलंदाज लगेच बाद झाल्याने केरळचा संघ १२५ षटकांत ३४२ धावांत गारद झाला. विदर्भासाठी पार्थ, हर्ष आणि वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडे यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ (पहिला डाव) : ३७९

केरळ (पहिला डाव) : १२५ षटकांत सर्व बाद ३४२ (सचिन बेबी ९८, आदित्य सरवटे ७८; दर्शन नळकांडे ३/५२, पार्थ रेखाडे ३/६५, हर्ष दुबे ३/८८)

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस