क्रीडा

सायनाचा 'सायोनारा'; वयाच्या ३५व्या वर्षी बॅडमिंटनला अलविदा

भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. ३५ वर्षीय सायना २०२३मध्ये अखेरचा सामना खेळली होती. त्यानंतर सततच्या दुखापतीमुळे ती खेळापासून दूर होती.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. ३५ वर्षीय सायना २०२३मध्ये अखेरचा सामना खेळली होती. त्यानंतर सततच्या दुखापतीमुळे ती खेळापासून दूर होती.

भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणारी बॅडमिंटन क्वीन सायना हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली. तिला फुलराणी म्हणूनही ओळखळे जायचे. “गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतींशी झुंजणाऱ्या सायनाने शरीर साथ देत नाही,” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि कारकी‍र्दीला पूर्णविराम दिला. गेल्या दोन वर्षांपासून सायना गुडघ्याच्या जुनाट समस्येमुळे त्रस्त होती. तिने आपला शेवटचा सामना २०२३ च्या सिंगापूर ओपनमध्ये खेळला होता.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना सायनाने स्पष्ट सांगितले की, “माझ्या गुडघ्याची दुखापत गंभीर असून मला संधिवात झाला आहे. सर्वोत्तम खेळ करण्यासाठी तुम्हाला दिवसाला ८ ते ९ तास सराव करणे आवश्यक आहे. परंतु, माझा गुडघा अवघ्या एक-दोन तासांतच माझी साथ सोडत होता. सूजही येत होते. त्यामुळे अधिक सराव करणे, माझ्यासाठी अवघड झाले. जर तुमचे शरीर साथ देत नसेल, तर थांबणेच योग्य असते.”

सायनाने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती, मात्र जिद्दीच्या जोरावर तिने पुनरागमन केले आणि २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्यानंतर २०१८ मध्ये तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषवलेल्या सायनाने सांगितले की, तिने आपल्या पालकांना आणि प्रशिक्षकांना आपल्या शारीरिक स्थितीबद्दल स्पष्ट कल्पना दिली होती. निवृत्तीच्या औपचारिक घोषणेपेक्षा, स्पर्धांमधील तिची अनुपस्थितीच चाहत्यांना सर्व काही सांगून जाईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. सायनाच्या या निर्णयामुळे भारतीय बॅडमिंटनमधील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाला असून, तिच्या योगदानाबद्दल क्रीडा विश्वातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सायनानंतर पी. व्ही. सिंधूने तिची जागा मिळवली. गेल्या काही वर्षांत सिंधू भारताचे जागतिक स्पर्धांमध्ये दमदार प्रतिनिधित्व करत आहे. मात्र तिसुद्धा गेल्या वर्षभरात संघर्ष करत आहे. त्यामुळे मालविका बनसोड, तन्वी शर्मा या नव्या दमाच्या खेळाडूंवर आता लक्ष आहे. दोघींनीही गेल्या काही काळात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच सायना व सिंधूंनंतर पुढील स्पर्धांमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये या दोघींकडून प्रामुख्याने अपेक्षा असेल. पुरुषांमध्ये लक्ष्य सेन, आयुष शेट्टी हे खेळाडू भारताचे भविष्य असून सात्विक-चिरागची जोडीदेखील दुहेरीत छाप पाडत आहे.

अश्लील व्हिडिओ प्रकरणी कर्नाटकच्या डीजीपींचे निलंबन; "कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही" - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Thane : जेवणाच्या जास्त दराबाबत विचारणा महागात; भिवंडीच्या ढाब्यावर तरुणाला मारहाण, Video व्हायरल, पोलिसांनी घेतली दखल

'स्वत:चं मत कुठे गेलं?' ची पोस्ट व्हायरल; जळगावातील महिला उमेदवाराला खरंच शून्य मतं? जाणून घ्या सत्य

Mumbai : मुदतीआधीच बेलासिस उड्डाणपुलाचे काम फत्ते! मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेवमधील वाहतूककोंडी फुटणार

महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ; MMRDA कडून ९६ अब्ज डॉलरचे गुंतवणूक करार; ९.६ लाख रोजगारांची निर्मिती होणार