नवी दिल्ली : भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी डेन्मार्कच्या किम अस्टूप आणि अँडर्स स्कारुप रासमुसेन या जोडीचा पराभव करत चायना मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, भारताचा अनुभवी खेळाडू किदांबी श्रीकांत याचे पुरुषांच्या एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
चौथे मानांकन प्राप्त सात्विक आणि चिराग यांनी ७० मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात डेन्मार्कच्या जोडीवर २१-१३, १६-२१, २१-१८ अशी मात केली. थायलंड ओपनमधील रौप्यपदक आणि मे महिन्यात सिंगापूर ओपनमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय जोडीने आपली शानदार कामगिरी कायम ठेवली आहे. उपांत्य फेरीत भारतीय जोडीचा सामना जागतिक क्रमवारीत २९व्या स्थानावर असलेल्या मलेशियाच्या नुर मोहम्मद अझरीन आणि टॅन वी किआँग या जोडीशी होईल. जागतिक स्पर्धेत सात्विक-चिरागने निराशा केली होती. आता मात्र त्यांच्याकडून जेतेपद अपेक्षित आहे.
पहिल्या गेममध्ये ५-१ अशी आक्रमक सुरुवात करत सात्विक-चिरागने १६-९ अशी भक्कम मध्यंतराची कमाई करत पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये डेन्मार्कच्या जोडीने पुनरागमन करत गेम १६-२१ असा खिशात घातला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये १७-१७ अशा बरोबरीनंतर भारतीय जोडीने संयम राखत सलग तीन महत्त्वपूर्ण गुण मिळवून २०-१७ अशी आघाडी घेतली व सामना आपल्या बाजूने झुकवला.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतला हाँगकाँगच्या ली च्युक कडून पराभव स्वीकारावा लागला. २५व्या क्रमांकावर असलेल्या ली च्युकने ३९ मिनिटांत श्रीकांतचा १६-२१, १६-२१ असा थेट गेममध्ये पराभव केला. यापूर्वी ३३ वर्षीय श्रीकांतने उपउपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या व्हिक्टर लाईचा २१-१८, २१-१९ असा पराभव केला होता.
मात्र, ली च्युकविरुद्धच्या सामन्यात दोन्ही गेममध्ये सुरुवातीला अनुक्रमे ३-० आणि ४-० अशी आघाडी मिळवूनही श्रीकांतला ती टिकवता आली नाही. विजय मिळवणारा ३० वर्षीय ली च्युक आता उपांत्य फेरीत फ्रान्सच्या जागतिक दुसऱ्या क्रमांकाच्या ख्रिस्टो पोपोव्ह याच्याशी दोन हात करणार आहे.