बुधवारी टी-२० वर्ल्डकपमधील 'अ' गटात झालेल्या भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात विजय मिळवत भारताने सुपर-८ मध्ये आपले स्थान पक्के केले. अमेरिकेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत १११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताला झुंजवण्याचा प्रयत्न केला. पण, ३ गडी बाद झाल्यावर मैदानात आलेल्या शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादवने भारताला ७ गडी आणि १० चेंडू राखून विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजीला अनुकुल खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी अमेरिकेला केवळ ११० धावांवरच रोखले. पण भारताची सुरूवातही खराब झाली. मुंबईत जन्मलेला अमेरिकेचा गोलंदाज सौरभ नेत्रवळकर याने पहिल्याच षटकात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला भोपळाही फोडू न देता बाद केले. त्यानंतर रोहित शर्मालाही टिपले.
तर, पंत केवळ १८ धावा करून परतला. पण, त्यानंतर मैदानात आलेल्या दुबे आणि सूर्याने संधी मिळेल तेव्हा मोठे फटके खेळत भारताला विजय मिळवून दिला. सामन्यादरम्यान अमेरिकेने वेळेत नवीन षटकाची सुरूवात न केल्यामुळे पंचांनी दंड म्हणून ठोठावलेल्या पाच धावांचाही भारतीय संघाला मोठा फायदा झाला. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत अर्धशतक साजरं करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामना संपल्यानंतर, हा विजय मिळवणं सोपं नव्हतं, असे म्हणत सूर्याच्या खेळीचे रोहित शर्मानेही कौतुक केले. अशातच सामना संपल्यानंतर सौरभ नेत्रवळकरने सूर्यासाठी केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचे मन जिंकले.
'चांगला खेळलास माझ्या भावा'
सौरभने सूर्याचा फोटो पोस्ट करीत, 'वेल प्लेड माय ब्रदर' (चांगला खेळलास माझ्या भावा) असे लिहिले. त्यासोबत पुढे, हार्ट आणि तिरंग्याचा इमोजीही जोडला. सौरभची ही पोस्ट आता भारतीय नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
सौरभ २००८ च्या कूचबिहार ट्रॉफीमध्ये ३० विकेट्स घेत चर्चेत आला होता. तो २०१० मध्ये भारताकडून अंडर-१९ विश्वचषकही खेळला आहे.