क्रीडा

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यानुसार, आज सकाळी ११ वाजता धवन चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचला.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यानुसार, आज सकाळी ११ वाजता धवन चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचला. बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी त्याला बोलावण्यात आले आहे. 1xBet या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित हे प्रकरण आहे.

शिखर धवनवर 1xBet या बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित जाहिराती आणि प्रमोशन केल्याचा आरोप आहे. ED धवनच्या या कथित जाहिराती आणि बेटिंग अ‍ॅपशी असलेल्या संबंधांची मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) चौकशी करत असून PMLA अंतर्गत त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे. या तपासाचा उद्देश धवनची भूमिका किती होती आणि बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार स्पष्ट करणे आहे. याआधी क्रिकेटपटू सुरेश रैना याचीही अशाच प्रकारची चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्म आणि त्यांच्या सेलिब्रिटी प्रमोटर्सवरील कारवाईचा एक भाग आहे, यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

दोषी आढळल्यास काय होऊ शकते?

जर शिखर धवनने चौकशीस सहकार्य केले नाही, तर ED न्यायालयात जाऊ शकते. त्यानंतर न्यायालय त्याच्याविरुद्ध नॉन-बेलेबल वॉरंट जारी करू शकते. शिवाय तपास संस्थेच्या चौकशीत आर्थिक व्यवहार किंवा मोठे संबंध उघड झाल्यास धवन अडचणीत सापडू शकतो. परंतु अद्याप तसे काहीही समोर आलेले नाही.

भारतात ऑनलाइन गेमिंगवर बंदी

दरम्यान, भारत सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेत ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५ (The Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025) मंजूर केले. त्यानंतर पैशांवर आधारित असलेले रिअल मनी गेमिंगवर (बेटिंग, फॅन्टसी स्पोर्ट्स, रम्मी, पोकर) वर बंदी घातली आहे. यामागचा उद्देश म्हणजे तरुणांमधील व्यसन, आर्थिक फसवणूक आणि सामाजिक दुष्परिणाम रोखणे. या कायद्यामुळे बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्म्सवरही कडक कारवाई सुरू झाली आहे. याचाच परिणाम म्हणून भारतीय क्रिकेट संघाने प्रायोजक ड्रीम11 देखील गमावला असून आशिया कपमध्ये संघ जर्सीवर कोणत्याही स्पॉन्सरशिवाय खेळण्याची शक्यता आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता