हैदराबाद : प्रतिभावान डावखुरा फलंदाज शिवम दुबेने मंगळवारी ३७ चेंडूंतच नाबाद ७१ धावा फटकावून धडाक्यात पुनरागमन केले. त्याला सूर्यकुमार यादवच्या (४६ चेंडूंत ७०) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सेनादलला ३९ धावांनी धूळ चारली.
३१ वर्षीय शिवम यापूर्वी सप्टेंबरमध्ये दुलीप ट्रॉफी स्पर्धेत अखेरचा खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे जवळपास ३ महिने तो क्रिकेटपासून दूर होता. अखेर मंगळवारी सेनादल संघाविरुद्ध इ-गटाच्या लढतीद्वारे शिवमने मुंबईच्या संघात पुनरागमन केले. त्याने २ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी केली. सूर्यकुमारने ७ चौकार व ४ षटकार लगावले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ चेंडूंतच १३० धावांची तुफानी भागीदारी रचली. त्यामुळे मुंबईने २० षटकांत ४ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली.
कर्णधार श्रेयस अय्यर (२०), अजिंक्य रहाणे (२२) यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलता आला नाही. मात्र सलामीवीर पृथ्वी शॉने पुन्हा एकदा निराशा केली. ३ चेंडूंत एकही धाव न करता तो माघारी परतला. गेल्या ४ पैकी २ लढतींमध्ये शॉ शून्यावर बाद झाला आहे. आयपीएल लिलावात त्याला कुणीही खरेदी केले नाही.
दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना सेनादलचा संघ १९.३ षटकांत १५३ धावांत गारद झाला. मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने ४, तर डावखुरा फिरकीपटू शम्स मुलाणीने ३ बळी मिळवले. त्याशिवाय शिवमने १ फलंदाज बाद केला. कर्णधार मोहित अहलावतने ५४ धावांची एकाकी झुंज दिली.
मुंबई-केरळ यांच्यात चुरस
पाच सामन्यांतील चार विजयांच्या १६ गुणांसह मुंबईचा संघ इ-गटात तिसऱ्या स्थानी आहे. या गटात आंध्र प्रदेश २० गुणांसह पहिल्या, तर केरळ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र केरळच्या सहाही साखळी लढती झालेल्या आहेत. तर मुंबईची अखेरच्या साखळी सामन्यात अग्रस्थानावरील आंध्र प्रदेशशी गाठ पडणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एका गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. आंध्र प्रदेशचे अग्रस्थान जवळपास पक्के असले तरी दुसऱ्या स्थानासाठी मुंबई व केरळ यांच्यात जोरदार चुरस आहे. महाराष्ट्र या गटात ८ गुणांसह पाचव्या स्थानी असल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
गोपाळची हॅटट्रिक; पंड्या बंधू अपयशी
कर्नाटकचा फिरकीपटू श्रेयस गोपाळने मंगळवारी बडोद्याविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली. त्याने हार्दिक व कृणाल या पंड्या बंधूंना पहिल्याच चेंडूवर बाद करण्यासह शाश्वत रावतला जाळ्यात अडकवले. मात्र यानंतरही कर्नाटकला पराभव पत्करावा लागला. कर्नाटकचे १७० धावांचे लक्ष्य बडोद्याने १८.५ षटकांत गाठले. बडोद्याने या विजयासह ब-गटात अग्रस्थान मिळवून आगेकूच केली. त्यांचे ६ सामन्यांत ५ विजयांचे सर्वाधिक २० गुण आहेत.
विदर्भाची अग्रस्थानी झेप
ड-गटात विदर्भाने छत्तीसगडला १६ धावांनी नमवून अग्रस्थानी झेप घेतली. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने २० षटकांत ५ बाद २०६ धावांचा डोंगर उभारला. शुभम दुबेने ३१ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. त्यानंतर छत्तीसगडचा डाव १९.५ षटकांत १९० धावांत आटोपला. अनुज तिवारीने ९८ धावांची झुंज दिली. दर्शन नळकांडेने ३ बळी मिळवले. विदर्भाच्या खात्यात ६ सामन्यांतील ४ विजयांचे १८ गुण आहेत. आसाम १२ गुणांसह या गटात दुसऱ्या स्थानी आहे.