क्रीडा

'शुभ' पर्व सुरू; गिलकडे कसोटीचे नेतृत्व; पंतकडे उपकर्णधारपद

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी अन् दिग्गज खेळाडूंनी अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे संक्रमणातून चाललेल्या भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व कोणत्या खेळाडूकडे सोपवणार याची उत्सुकता ताणली होती. अखेर युवा फलंदाज शुभमन गिलच्या खांद्यावर भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी अन् दिग्गज खेळाडूंनी अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे संक्रमणातून चाललेल्या भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व कोणत्या खेळाडूकडे सोपवणार याची उत्सुकता ताणली होती. अखेर युवा फलंदाज शुभमन गिलच्या खांद्यावर भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यापासून गिलच्या नेतृत्व मोहिमेला सुरुवात होणार असून ही मालिका त्याच्यातील नेतृत्व कौशल्याची अग्निपरीक्षा घेणारी असेल. तसेच अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी गिलवर असेल.

मन्सूर अली खान पतोडी (२१ वर्षे), सचिन तेंडुलकर (२३ वर्षे), कपिल देव (२४ वर्षे) आणि रवी शास्त्री (२५ वर्षे) यांच्यानंतर २५ वर्षीय गिल हा भारताचा पाचवा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. २० जूनपासून लिड्स येथे इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर यांनी शनिवारी इंग्लंड दौऱ्यासाठी १८ खेळाडूंच्या भारतीय संघाची निवड जाहीर केली. या संघात कोणतेही मोठे धक्कादायक बदल नाहीत.

दरम्यान संघातील संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा इंग्लंडमधील सर्व पाच कसोटी सामने खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही, अशी माहिती अजित आगरकर यांनी दिली. आगरकर म्हणाले की, फिजिओ आणि वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार बुमरा हा सर्व पाच कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल असे मला वाटत नाही असे आगरकर म्हणाले.

...म्हणून पंतकडे जबाबदारी

गेल्या चार-पाच वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये पंत हा चांगली फलंदाजी करत आहे. यष्टीरक्षक हा संघावर योग्य प्रकारे लक्ष ठेवू शकतो. त्यामुळे पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे आगरकर म्हणाले.

अर्शदीप, सुदर्शनला प्रथमच संधी

युवा डावखुरा खेळाडू बी साई सुदर्शन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना कसोटी संघात प्रथमच स्थान देण्यात आले आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे साईची निवड झालेली नाही, तर संयम आणि वरच्या पातळीवर खेळ उंचावण्याची क्षमता यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो, असे आगरकर म्हणाले.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.

गेल्या वर्षभरापासून आम्ही गिलकडे कर्णधार म्हणून पाहत होतो. संघाला तो पुढे घेऊन जाऊ शकतो, याबाबत आम्ही आशावादी आहोत. कर्णधारावर प्रचंड दबाव असतो, परंतु तो त्यासाठी सक्षम आहे. त्याला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. - अजित आगरकर, मुख्य निवडकर्ते

नायरचे पुनरागमन; अनफीट शमी बाहेर

करुण नायरसाठी ही संघ निवड ‌विशेष ठरली आहे. आठ वर्षांनंतर त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. २०१७ मध्ये तो शेवटचा सामना खेळला होता. दुसऱ्यांदा त्रिशतक झळकावल्यानंतरही नायरला त्यावेळी संघातून वगळण्यात आले होते. तंदुरुस्तीमुळे मोहम्मद शमीला या संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या निवडीबाबत आम्हाला अपेक्षा होती. मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे आगरकर पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळालेल्या हर्षित राणा आणि सर्फराज खान यांना या संघातून वगळले आहे. दरम्यान गिल आणि जसप्रीत बुमरा हे दोन खेळाडू कर्णधारपदाच्या स्पर्धेत आघाडीवर होते. निवडकर्त्यांनी गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला.

Pune Accident : कोरेगाव पार्क परिसरात भीषण दुर्घटना; भरधाव कारची मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक, गाडीचे झाले तुकडे, २ भावांचा जागीच मृत्यू |Video

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

Women’s World Cup : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महिला विश्वचषक फायनलसाठी हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द

मांडवा जेट्टी कोसळण्याच्या उंबरठ्यावर? प्रवाशांचा जीव धोक्यात; सागरी मंडळाचे दुर्लक्ष

कुष्ठरोग आता ‘नोटिफायबल डिसीज’; डॉक्टरांना २ आठवड्यांत अहवाल देणे बंधनकारक, २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र’चे लक्ष्य