AFP
क्रीडा

सिनर अमेरिकेचा नवा सम्राट! अमेरिकेच्याच फ्रिट्झला धूळ चारत कारकीर्दीतील दुसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी

Swapnil S

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपनच्या पटलावर सोमवारी मध्यरात्री जॅनिक सिनरच्या रूपात नवा टेनिस सम्राट उदयास आला. इटलीच्या अग्रमानांकित सिनरने अमेरिकेच्याच टेलर फ्रिट्झला नमवून प्रथमच अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्याचे हे कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.

आर्थर ॲश स्टेडियमवर झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या २३ वर्षीय सिनरने २६ वर्षीय फ्रिट्झवर ६-३, ६-४, ७-५ असे सरळ तीन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. सिनरने १२व्या मानांकित फ्रिट्झविरुद्धची ही लढत २ तास आणि १६ मिनिटांच्या संघर्षानंतर जिंकली. सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच, स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांसारखे आघाडीचे टेनिसपटू उपांत्य फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर गेल्याने सिनरलाच विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. सिनरने चाहत्यांचा विश्वास खरा ठरवला.

फ्रिट्झच्या पराभवामुळे मात्र एखाद्या अमेरिकन खेळाडूने ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. २१ वर्षांपूर्वी म्हणजेच २००३मध्ये अँडी रॉडिक या अमेरिकन खेळाडूने यूएस ओपनचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर एकाही खेळाडूला अशी कामगिरी जमलेली नाही. फ्रिट्झने प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्याला पहिल्या जेतेपदासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

सिनरने वर्षाच्या सुरुवातील ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवले होते. विम्बल्डन व फ्रेंच स्पर्धेत त्याला उपांत्य फेरीपर्यंतच मजल मारता आली. मात्र अमेरिकन ओपनमध्ये त्याने यावेळी अंतिम फेरी गाठली. तसेच स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी त्याचे नाव डोपिंगमध्ये (उत्तेजक चाचणीत) आढळले. मात्र या सर्व बाबींवर मात करून सिनरने जेतेपदाचा चषक उंचावला. अंतिम फेरीत त्याने फ्रिट्झला फारसे डोके वर काढू दिले नाही. मुख्य म्हणजे उपांत्यपूर्व फेरी वगळता त्याला एकाही लढतीत चौथ्या सेटपर्यंत विजयासाठी थांबावे लागले नाही. यावरूनच सिनरचे या स्पर्धेतील वर्चस्व अधोरेखित होते.

सिनर हा एकाच वर्षात कारकीर्दीतील पहिले दोन ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी १९७७ मध्ये गुलिर्मो विलासने अशी कामगिरी केली होती. यंदाच्या वर्षात सिनरने दोन (ऑस्ट्रेलियन व अमेरिकन) तसेच अल्कराझने दोन (विम्बल्डन व फ्रेंच) ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवली.

महिलांमध्ये सबालेंकाची बाजी

महिला एकेरीत बेलारूसच्या दुसऱ्या मानांकित आर्यना सबालेंकाने बाजी मारली. गतवर्षी उपविजेतेपद मिळवणाऱ्या सबालेंकाने यावेळी कारकीर्दीतील तिसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालताना अंतिम फेरीत अमेरिकेच्या सहाव्या मानांकित जेसिका पेगुला हिला ७-५, ७-५ असे नेस्तनाबूत केले. सबालेंकाचेसुद्धा हे या वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. जानेवारीत तिने ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा