लंडन : लॉर्ड्सवर धावा जमवताना भारतीय फलंदाजांना कठीण गेले. तेथील परिस्थितीला लवकर जुळवून घेण्यात भारतीय महिलांना अपयश आले. मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फटक्यांची निवड चुकल्याची कबुली भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने दिली.
मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ विकेट्सने बाजी मारल्यानंतर शनिवारी रात्री उशीरा झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली. पावसामुळे हा सामना २९ षटकांचा खेळविण्यात आला. लॉर्ड्सवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या महिलांनी ८ विकेट्सने बाजी मारत मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे.
उपकर्णधार स्मृती मानधना (४२ धावा) आणि दीप्ति शर्मा (नाबाद ३० धावा) वगळता भारताची फलंदाजी ढासळली. २९ षटकांत पाहुण्या संघाला केवळ १४३ धावा जमवता आल्या.
मला वाटते की परिस्थितीला जुळवून घेण्यात भारताचे फलंदाज कमी पडले. भारतीय फलंदाजांनी जे फटके मारले ते मारायला नको होते. कठीण खेळपट्टीवर खासकरून लॉर्ड्सवर असे फटके मारणे सोपे नसते, असे मानधना म्हणाली. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती. सामन्याआधी पडलेल्या पावसाचा खेळपट्टीवर परिणाम झाल्याचे मानधनाने सांगितले.
पावसाचा कामगिरीवर परिणाम होतो. पावसामुळे सामन्यातील षटके कमी होतात. अशा सामन्यात नाणेफेक हरल्यास आणखी अडचण होते. पण तरीही चांगला खेळ करणे हे खेळाडूंच्या हातात असते असे मानधना म्हणाली.
लॉर्ड्सवर धावा करणे कठीण
लॉर्ड्सवर धावा करणे नेहमीच कठीण असते, पण फलंदाजांसाठी तो धडा असतो. संघातील बरेच खेळाडू पहिल्यांदाच लॉर्ड्सवर खेळले. त्यामुळे त्यातून बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्याचे मानधना म्हणाली.