आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानचा श्रीलंकेने सुपर-४ फेरीत चार विकेट्स राखून दमदार विजय मिळविला आणि फायनलच्या दिशेने आगेकूच केली. ४५ चेंडूंत ८४ धावा करणाऱ्या रहमानुल्लाह गुरबाझला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १७५ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने विजयी लक्ष्य चार विकेट्स आणि पाच चेंडू राखत सहज पूर्ण केले. विजयासाठी १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला ६२ धावांची दमदार सलामी मिळाली. कुशल मेंडिस आणि पथुम निसांका यांनी सुरुवातीपासून फटकेबाजीला सुरुवात केली. मेंडिसने ३६ धावा केल्या. पथुमने यावेळी ३५ धावा करत कुशलला शानदार साथ दिली. त्यानंतर श्रीलंकेचे तीन फलंदाज ठरावीक फरकाने बाद झाले. धनुशा गुणतिलकाने २० चेंडूंत ३३ धावा करत धावसंख्या वाढविली. रशिद खानने त्याला बाद केले.
भानुका राजपक्षने १४ चेंडूंत ३१ धावा करून विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. निर्णायकक्षणी तो बाद झाला. त्यामुळे पुन्हा उत्सुकता वाढली. वानिंडू हसरंगाने मोक्याच्या क्षणी ९ चेंडूंत तीन चौकार लगावत नाबाद १६ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. १९.१ षट्कात ६ बाद १७९ धावा करीत श्रीलंकेने विजय साकार केला.
त्याआधी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाझने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा जबरदस्त समाचार घेतला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. गुरबाझने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि सहा षट्कार लगावत ८४ धावांची खेळी केली. गुरबाझला इब्राहिम झारदानने ४० धावांची खेळी करत दमदार साथ दिली.