क्रीडा

राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा :पुण्याच्या आयुष, तनयाची जेतेपदाला गवसणी

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट, दादर यांच्या संयुक्त विजमाने आयोजित ५७व्या उपकनिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत (१४ वर्षांखालील) आयुष गरुड व तनया पाटील या पुणेकरांनी विजेतेपद मिळवले. मुंबईचा रुद्र गवारे आणि रत्नागिरीची स्वरा मोहिरे यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट, दादर येथे झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम फेरीत आयुषने रुद्रला २१-१०, २१-५ अशी सहज धूळ चारली. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या वेदांत राणेने रत्नागिरीच्या द्रोण हजारेवर १०-१४, १४-९, १७-४ अशी मात केली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात तनयाने स्वराचा १९-५, २१-० असा धुव्वा उडवला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत सिंधुदुर्गच्या पूर्वा केतकरने रत्नागिरीच्या स्वरा कदमवर ११-५, १०-८ असे वर्चस्व गाजवले.

विजेत्या खेळाडूंना विश्वविजेता संदीप दिवे, संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार केतन चिखले, सचिव अरुण केदार व आंतरराष्ट्रीय पंच अजित सावंत यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कॅडेट गटात ठाण्याचा नील, जळगावची ज्ञानेश्वरी विजयी

कॅडेट म्हणजेच १२ वर्षांखालील मुलांच्या गटात ठाण्याचा नील म्हात्रे, तर मुलींच्या गटात जळगावची ज्ञानेश्वरी धोंगडे यांनी जेतेपदाला गवसणी घातली. नीलने अंतिम फेरीत ठाण्याच्याच अनंत जैनला १५-११, १५-८ असे नेस्तनाबूत केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरच्या ओंकार वडारने मुंबईच्या प्रताप केदारवर २१-७, २१-० असे प्रभुत्व मिळवले. मुलींच्या गटात ज्ञानेश्वरीने रत्नागिरीच्या निधी सप्रेला १४-१०, २-२१, १७-९ असे संघर्षपूर्ण लढतीत नमवले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात सिंधुदुर्गच्या दिव्या राणेने मुंबईच्या सुसान बासीमल्लावर १७-५, ०-१८, १७-१३ अशी सरशी साधली.

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती