सूर्यकुमार, गिलला भारतीय संघातून डच्चू; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी BCCI ची संभाव्य यादी जाहीर Photo : X
क्रीडा

सूर्यकुमार, गिलला भारतीय संघातून डच्चू; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी BCCI ची संभाव्य यादी जाहीर

जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑलिम्पिक भारतीय असोसिएशनकडे (आयओए) ३० संभाव्य खेळाडूंची यादी सुपूर्द केली आहे. १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या क्रीडा महाकुंभासाठी जाहीर केलेल्या यादीतून भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कसोटी तसेच एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यांना डच्चू देण्यात आला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑलिम्पिक भारतीय असोसिएशनकडे (आयओए) ३० संभाव्य खेळाडूंची यादी सुपूर्द केली आहे. १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या क्रीडा महाकुंभासाठी जाहीर केलेल्या यादीतून भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कसोटी तसेच एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यांना डच्चू देण्यात आला आहे.

युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचा या ३० खेळाडूंच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या काळातच भारतीय संघाची मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका होणार असल्याने निवड समितीला दोन वेगवेगळे संघ तयार करावे लागणार आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध २७सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार असून शुभमन गिल या मालिकेत एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता असल्याने त्याला आशियाई स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले नाही.

दुसरीकडे, २०२८ च्या ऑलिम्पिक गेम्स आणि आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या भविष्यातील नियोजनात सूर्यकुमार यादवचा विचार केला जात नसल्याचे समजते, त्यामुळेच त्याचे : नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांची नावे आघाडीवर आहेत.

गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराचे नाव समाविष्ट असले तरी २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. दुखापतीतून सावरणारा हर्षित राणा, प्रसिध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांनाही या संभाव्य यादीत स्थान मिळाले आहे. फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्ष दुबे यांचा समावेश आहे.

संभाव्य खेळाडूंची यादी :

यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, आयुष बदोनी, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, रवी बिश्णोई, शाहबाझ अहमद, शिवम दुबे, विपराज निगम, हर्षित राणा, यश ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.

Mumbai : ७ अभियंता, कर्मचाऱ्यांवर कारवाई; कोरोनाकाळात पत्नीच्या नावे कंत्राटे, ५० हजारांचा दंड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची शिफारस

न्यायव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाने हरयाणा पोलिसांना फटकारले

Mumbai : डबेवाल्यांची नवी इनिंग, क्लाऊड किचन उभारणार; जुनी सेवा अडचणीत, काळानुसार बदलण्याचा निर्णय

१०० कुटुंबांचे भवितव्य टांगणीला; बनावट मंजुऱ्या, डोंबिवलीतील बिल्डरला अखेर अटक

सीयूईटी-यूजी परीक्षेला तांत्रिक बिघाडाने विलंब