क्रीडा

सूर्यकुमार, शिवम मुंबई संघात परतले; हरयाणाविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत खेळणार

भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे यांचे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी मुंबईच्या संघात पुनरागमन झाले आहे.

Swapnil S

मुंबई : भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे यांचे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी मुंबईच्या संघात पुनरागमन झाले आहे. ८ फेब्रुवारीपासून रोहतक येथे मुंबईची उपांत्यपूर्व लढतीत हरयाणाशी गाठ पडणार आहे.

गत‌वर्षी ११ ऑक्टोबरपासून स्थानिक क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेचा ९०वा हंगाम सुरू झाला. लाल चेंडूने खेळवण्यात येणारी ही स्पर्धा यावेळी प्रथमच दोन टप्प्यांत रंगली. नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात सय्यद मुश्ताक अली व विजय हजारे या टी-२० व एकदिवसीय प्रकारातील देशांतर्गत स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर २३ जानेवारीपासून रणजीच्या दुसऱ्या टप्प्याला पुन्हा प्रारंभ झाला. या टप्प्यात रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा असे तारांकित भारतीय खेळाडू आपापल्या संघाकडून खेळले. त्यावेळी सूर्यकुमार व शिवम इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र आता या दोघांचाही इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीसुद्धा भारतीय संघात समावेश नाही. त्यामुळे दोघेही पुन्हा रणजीकडे वळले आहेत.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने गतवर्षी ४२व्यांदा रणजी करंडक उंचवला. यंदा साखळीत बडोदा व जम्मू-काश्मीरकडून पराभव पत्करूनही निर्णायक लढतीत मुंबईने मेघालयला एका डावाच्या फरकाने धूळ चारली. त्यामुळे त्यांनी बोनस गुणासह विजय मिळवतानाच अ-गटातून दुसऱ्या स्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता हरयाणाविरुद्ध गतविजेत्यांचा कस लागणार आहे.

सूर्यकुमार यंदा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राविरुद्ध एकमेव रणजी सामना खेळला. तसेच दुबे जम्मूविरुद्ध एकमेव रणजी लढत खेळला. या दोघांच्या पुनरागमनाने मुंबईचा संघ बळकट झाला असला, तरी त्यांच्यासाठी कुणाला संघातून डच्चू मिळणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान, श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असल्याने तो उर्वरित रणजी स्पर्धेत आता खेळताना दिसणार नाही.

दरम्यान, अन्य उपांत्यपूर्व लढतींमध्ये जम्मू-काश्मीर वि. केरळ, विदर्भ वि. तमिळनाडू, सौराष्ट्र वि. गुजरात आमनेसामने येतील.

मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंक्रिश रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दूल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सेल्व्हेस्टर डीसोझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या