कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने अवघ्या २१ चेंडूंत नाबाद ६० धावांची तुफानी खेळी करत मुंबईला सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला. ड-गटामधील या सामन्यात मुंबईने हैदराबादचे १७३ धावांचे लक्ष्य अवघ्या १३.१ षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. मुंबईने सात विकेट्स राखून आणि तब्बल ४१ चेंडू शिल्लक ठेवत विजय नोंदवला.
१५ चेंडूंत अर्धशतक
जादवपूर विद्यापीठाच्या मैदानावर सूर्यकुमार यादवने आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने २८५.७१ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना सहा चौकार आणि पाच षटकार ठोकले. विशेष म्हणजे, त्याने अवघ्या १५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. हैदराबादने निर्धारित २० षटकांत १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला.
मुशीरचीही फटकेबाजी
युवा फलंदाज मुशीर खाननेही शानदार फलंदाजी करताना २४ चेंडूंत ५१ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. अंगक्रिश रघुवंशीने अवघ्या १३ चेंडूंत २७ धावा करत मुंबईला वेगवान सुरुवात करून दिली. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
हार्दिक तामोरेने १६ चेंडूंत २२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर मुशीर आणि सूर्यकुमार यांनी आक्रमक फलंदाजी करत विजयाचा मार्ग सुकर केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. बाराव्या षटकात अजय देव गौडने मुशीरला बाद केले. मात्र, सूर्यकुमारने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. शिवम दुबेनेही पाच चेंडूंत नाबाद १३ धावा करत दोन घटकार ठोकले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत १७२ धावा केल्या. अभिरथ रेड्डीने २४ चेंडूंत ३५ धावा करत संघाकडून सर्वाधिक योगदान दिले. कोडिमेला हिमतेजाने १६ चेंडूंत २५, तर कर्णधार चामा मिलिंदने १२ चेंडूंत २२ धावा केल्या. प्रणव वर्माने १४ चेंडूंत १८ धावा जोडल्या.
मुंबईकडून डावखुरा फिरकीपटू मॅक्सवेल स्वामीनाथनने प्रभावी गोलंदाजी करत चार षटकांत २३ धावांत तीन विकेट्स घेतल्या. शिवम दुबे आणि सैराज पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. शार्दुल ठाकूर आणि अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.