क्रीडा

टी-२० मालिका भारताच्या खिशात; सूर्यकुमार यादवचा धडाका २२ चेंडूंत ६१ धावा

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी आक्रमक पवित्रा घेतला

वृत्तसंस्था

भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १६ धावांनी पराभव करून तीन सामन्यांची टी-२० मालिका २-० ने खिशात घातली. विजयासाठी २३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत तीन बाद २२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. क्विंटन डी कॉक शर्मा (४८ चेंडूंत नाबाद ६९) आणि डेव्हिड मिलर (४७ चेंडूंत नाबाद १०६) यांचे प्रयत्न तोकडे पडले. भारताच्या अर्शदीप सिंगने दोन विकेट‌्स घेतल्या. सूर्यकुमार यादव (२२ चेंडूंत ६१), के. एल. राहुल (२८ चेंडूंत ५७), विराट कोहली (२८ चेंडूंत नाबाद ४९) आणि कर्णधार रोहित शर्मा (३७ चेंडूंत ४३) यांनी विजयाचा पाया रचला.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी आक्रमक पवित्रा घेतला; मात्र पहिल्या तीन षट्कात २१ धावाच निघाल्या. पुढील तीन षट्कात या दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. सहा षट्कात भारताच्या बिनबाद ५७ धावा झाल्या. दोघांची मोठ्या भागीदारीकडे वाटचाल सुरू असतानाच दहाव्या षट्कातील पाचव्या चेंडूवर केशव महाराजने रोहितला स्टब्सच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. रोहितने ३७ चेंडूंत ४३ धावा करताना एक षट्कार आणि सात चौकार लगावले. रोहित-राहुल यांच्यात ९६ धावांची भागीदारी झाली. राहुलने आपले अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर केशव महाराजच्या चेंडूला स्वीप करण्याच्या प्रयत्नात पायचित झाला. राहुलने २८ चेंडूंत ५७ धावा करताना चार षट्कार आणि पाच चौकार लगावले. सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याला विराट कोहलीने शानदार साथ दिली. या दोघांनी अवघ्या ४२ चेंडूतच शतकी भागीदारी रचली; मात्र एकोणिसाव्या षट्कातील पहिल्या चेंडूवर सूर्यकूमार धावचित झाला. त्याने २२ चेंडूत ६१ धावा फटकविताना पाच षट्कार आणि पाच चौकार लगावले. विराट कोहली अर्धशतकाजवळ पोहोचला असतानाच दिनेश कार्तिकने (७ चेंडूत नाबाद १७) धावा केल्या. कोहलीने २८ चेंडूंत नाबाद ४९ धावा करताना एक षट्कार आणि सात चौकार लगावले. भारताने निर्धारित षट्कात तीन बाद २३७ धावांपर्यंत मजल मारली. भारताची ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सर्वोच्च टी-२० धावसंख्या ठरली.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

GST त दिलासा; १२ टक्क्यांचा स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल