नवी दिल्ली : तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा सध्या भारताचा सर्वाधिक मौल्यवान खेळाडू आहे, यात शंका नाही. २०२६चा टी-२० विश्वचषक जिंकवून देण्यात ३२ वर्षीय बुमराने मोलाची भूमिका बजावली. आता २०२७मध्ये एकदिवसीय विश्वचषक (५० षटकांचा) रंगणार असल्याने बुमराला प्रामुख्याने एकदिवसीय प्रकारांत प्राधान्य दिले जाईल, तर टी-२० सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्याचा पवित्रा संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. बुमराचे वर्कलोड मॅनेजमेंट (खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन) हा मुद्दा पुढील काही काळासाठी चर्चेत असणार आहे.
काही दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८६ हजारांहून अधिक दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने रंगलेल्या टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्याचबरोबर भारताने आयसीसी जेतेपदाची हॅटट्रिक साध्य केली. भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता.
२०२४मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी मुंबईतील नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या परिसरात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच बीसीसीआयने १२५ रुपयांचा धनादेश देऊन भारतीय संघाचा गौरवही केला होता. यावेळी बीसीसीआयने विजेत्या संघाला १३१ कोटींचे पारितोषिक जाहीर केले आहे. मात्र विजयी मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे बुमरासह सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले असून लवकरच ते आयपीएलच्या तयारीला लागतील. २८ मार्चपासून आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होईल.
दरम्यान, बुमराने २०२४च्या टी-२० विश्वचषकात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. तसेच २०२६च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीत त्याने १५ धावांत ४ बळी घेत सामनावीर पुरस्कार जिंकला. टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने बुमराला फक्त टी-२० सामन्यांत तसेच कसोटी प्रकारात प्राधान्य दिले जात होते. बुमरा कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना १९ नोव्हेंबर, २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. हाच तो सामना जेव्हा अहमदाबाद येथे भारताला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. म्हणजेच गेली अडीच वर्षे बुमरा एकही एकदिवसीय लढत खेळलेला नाही.
बुमरा कसोटी प्रकारात भारताचा प्रमुख खेळाडू आहेच. त्याने गतवर्षी बॉर्डर-गावस्कर मालिकेत सर्वाधिक ३२ बळी मिळवले होते. तसेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या संघांविरुद्धही तो कसोटी मालिका खेळला. आता २०२७मध्ये दक्षिण आफ्रिका येथे एकदिवसीय विश्वचषक होईल. तर पुढील टी-२० विश्वचषक २०२८मध्ये होईल. त्यामुळे संघ व्यवस्थापन आयपीएलनंतर बुमराला प्रामुख्याने एकदिवसीय प्रकारांसाठी राखीव ठेवेल. तसेच भारतातील टी-२० सामने अथवा कसोटी सामन्यांसाठीही त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. इंग्लंड दौऱ्यात बुमरा पाचपैकी तीनच लढती खेळला होता. त्यामुळेच आता बुमरावरील भार कमी करून त्याला योग्य त्या लढतींसाठी तंदुरुस्त ठेवण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनापुढे असेल.
बुमराने या विश्वचषकात अनेकदा दडपणात गोलंदाजीस येत टिच्चून मारा केला. अनेकदा त्याला बळी मिळाले नाही. मात्र त्याच्या गोलंदाजीवर फलंदाज जोखीम घेणे पत्करत नाही. त्यामुळेच धावा आपोआप कमी होतात व याचा लाभ अन्य गोलंदाजांना होतो. वानखेडेच्या ज्या खेळपट्टीवर जेथे प्रत्येक गोलंदाज षटकात किमान १० ते १२ धावा लुटत होता. उपांत्य फेरीत इंग्लंडला ३० चेंडूंत ६९ धावांची गरज असताना बुमराने १६व्या षटकात फक्त ८ धावा दिल्या. तर १८ चेंडूंत ४५ धावांची आवश्यकता असताना बुमराने एकही चौकार वसूल न करता फक्त ६ धावा दिल्या. त्यामुळेच इंग्लंडच्या फलंदाजांवर उर्वरित षटकांत दडपण वाढले व अन्य गोलंदाजांवर आक्रमण करण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच बुमराने सादर केलेला गोलंदाजीचा नमुना कौतुकास्पद होता. चाहत्यांनीही बुमराची चार षटके झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट करून त्याला मानवंदना दिली.
आयपीएलमध्ये सर्व सामन्यांसाठी उपलब्ध
बुमरा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये एक संघ साधारणपणे १४ सामने खेळतो. तसेच बाद फेरी गाठल्यास यामध्ये २-३ सामन्यांची आणखी भर पडू शकते. म्हणजेच २ महिन्यांत एका खेळाडूला १५ ते १६ सामने खेळावे लागतात. बुमराला आयपीएलमध्ये काही लढतींसाठी विश्रांती द्यायची की नाही, हा निर्णय सर्वस्वीपणे मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाचा असेल. यामध्ये बीसीसीआय किंवा भारतीय संघ हस्तक्षेप करू शकत नाही. कारण आयपीएलमध्ये खेळाडूला फ्रँचायझी मालकाकडून त्यानुसार पैसे देण्यात येतात. त्यामुळे बुमरासारखा खेळाडू प्रत्येक लढतीसाठी उपलब्ध असावा, असेच मुंबई संघाला वाटणे स्वाभाविक आहे.
तूर्तास, आयपीएलच्या १९व्या हंगामासाठी बुधवारी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. विराट कोहलीचा समावेश असलेला आणि रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ रविवार, २९ मार्च रोजी आपल्या अभियानास प्रारंभ करेल. त्यांची वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडेल.
पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने बीसीसीआय त्या तारखा स्पष्ट झाल्यावर पुढील वेळापत्रक त्यानुसार जाहीर करणार आहे. एकूण १६ दिवसांचे वेळापत्रक तूर्तास जाहीर करण्यात आले असून या दरम्यान २० सामने खेळवण्यात येतील. प्रत्येक संघाच्या वाट्याला ४ सामने येतील. मुंबईचा संघ अनुक्रमे कोलकाता (२९ मार्च), दिल्ली (४ एप्रिल), राजस्थान (७ एप्रिल) व बंगळुरू (१२ एप्रिल) यांच्याविरुद्ध सुरुवातीचे चार सामने खेळणार आहे.
यावेळी ४-५ एप्रिल व ११-१२ एप्रिल या शनिवार-रविवारी प्रत्येकी दोन लढती होतील. १० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेद्वारे असंख्य चाहत्यांचे मनोरंजन होते. तसेच भारताला गुणवान क्रीडापटू गवसतात.
अभिषेक, इशान क्रमवारीत पहिल्या दोन स्थानी
अभिषेक शर्मा व इशान किशन या भारताच्या दोन डावखुऱ्या धडाकेबाज फलंदाजांनी जागतिक टी-२० क्रमवारीत पहिले दोन स्थान काबिज केले आहे. अभिषेक विश्वचषकापूर्वीदेखील अग्रस्थानीच होता, तर किशनने मात्र जोरदार मुसंडी मारताना सातव्यावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
नुकताच झालेल्या टी-२० विश्वचषकात अभिषेक काहीसा फ्लॉप ठरला होता. मात्र अंतिम फेरीत त्याने शानदार अर्धशतक साकारले. तीन सामन्यांत तो शून्यावरदेखील बाद झाला होता. मात्र झिम्बाब्वे व न्यूझीलंडविरुद्धच्या अर्धशतकांमुळे त्याने अग्रस्थान टिकवले आहे. अभिषेकच्या खात्यात सध्या ८७५ गुण जमा आहेत. तर किशन ८७१ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. किशनने टी-२० विश्वचषकात ३१७ धावा कुटल्या. भारताकडून या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा संजू सॅमसन (३२१) १८व्या क्रमांकावर आहे. तिलक वर्मा ७४२ गुणांसह सातव्या स्थानी आहे.
गोलंदाजांमध्ये भारताच्या वरुण चक्रवर्तीची अग्रस्थानावरून घसरण झाली आहे. वरुणने विश्वचषकात १४ बळी मिळवले. मात्र निर्णायक लढतींमध्ये सपाटून मार खाल्ला. त्याच्या खात्यात सध्या ७४० गुण असून अफगाणिस्तानचा रशिद खान ७५३ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. बुमराने ७०२ गुणांसह सहावे स्थान पटकावले आहे. अष्टपैलूंमध्ये भारताचा हार्दिक पंड्या दुसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने अग्रस्थान पटकावले आहे.