क्रीडा

युवा आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा : १४ वर्षीय वैभवचे ३२ चेंडूंत शतक

१४ वर्षीय प्रतिभावान डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने शुक्रवारी ‘बाल दिन’ उत्साहात साजरा केला. वैभवने ३२ चेंडूंत शतक झळकावण्यासह ४२ चेंडूंत १४४ धावांची घणाघाती खेळी साकारली.

Swapnil S

दोहा : १४ वर्षीय प्रतिभावान डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने शुक्रवारी ‘बाल दिन’ उत्साहात साजरा केला. वैभवने ३२ चेंडूंत शतक झळकावण्यासह ४२ चेंडूंत १४४ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्यामुळे भारत-अ संघाने युवा आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत धडाक्यात विजयारंभ करताना संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) १४८ धावांनी फडशा पाडला.

कतार (दोहा) येथे शुक्रवारपासून युवांची आशिया चषक स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत जितेश शर्मा भारताचे नेतृत्व करत आहे. ३० वर्षांवरील एकच खेळाडू संघात ठेवण्यास मुभा असून अन्य खेळाडू ३० वर्षांखालील असणे गरजेचे आहे. भारताचा अ-गटात समावेश असून त्यांना यूएईनंतर अनुक्रमे पाकिस्तान (१६ नोव्हेंबर) व ओमान (१८ नोव्हेंबर) यांच्याशी दोन हात करायचे आहेत. ब-गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग व श्रीलंका हे संघ आहेत.

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २९७ धावांचा डोंगर उभारला. आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना लक्ष वेधणाऱ्या वैभवने ११ चौकार व १५ षटकारांची आतषबाजी केली. वैभवने ३२ चेंडूंत शतक पूर्ण केले. भारतीय खेळाडूतर्फे हे टी-२०तील संयुक्तपणे दुसरे वेगवान शतक ठरले. यापूर्वी उर्विल पटेल (गुजरात) व अभिषेक शर्मा (पंजाब) यांनी मुश्ताक अली स्पर्धेत २८ चेंडूंत, तर पंतने २०१८मध्ये ३२ चेंडूंत शतक साकारले होते. वैभवला कर्णधार जितेश (३२ चेंडूंत नाबाद ८३), नमन धीर (३४) यांची उपयुक्त साथ लाभली.

वैभवचे सध्याचे वय १४ वर्षे व २३२ दिवस आहे. त्यामुळे भारताकडून एखाद्या स्पर्धेत टी-२० शतक झळकावणारा तो सर्वात युवा फलंदाजही ठरला. “मी माझा नैसर्गिक खेळ केला. मला टी-२० प्रकारात फलंदाजी करणे नेहमीच आवडते. पहिल्याच चेंडूवर झेल सुटल्यावर मी त्याचा लाभ उचलू शकल्याचा आनंद आहे,” असे वैभव म्हणाला. तसेच त्याने या शतकाचे श्रेय वडिलांना दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघ २० षटकांत ७ बाद १४९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. गुर्जापनीत सिंगने ३ बळी मिळवले. एकंदरीत माजी विजेत्या भारताने यंदाच्या युवा आशिया चषकाची शानदार सुरुवात केली आहे.

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब