Photo : PTI
क्रीडा

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : गतविजेत्या कर्नाटकचे मुंबईसमोर कडवे आव्हान; उपांत्यपूर्व फेरीला आजपासून प्रारंभ

विजय हजारे करंडक या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. यातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईसमोर गतविजेत्या कर्नाटकचे कडवे आव्हान असेल. या लढतीत सर्फराझ खान आणि देवदत्त पडिक्कल यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

Swapnil S

बंगळुरू : विजय हजारे करंडक या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. यातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईसमोर गतविजेत्या कर्नाटकचे कडवे आव्हान असेल. या लढतीत सर्फराझ खान आणि देवदत्त पडिक्कल यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेच्या ३३व्या हंगामाला प्रारंभ झाला. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. २०२४-२५च्या हंगामात कर्नाटकने अंतिम फेरीत विदर्भाला नमवून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. याबरोबरच त्यांनी सर्वाधिक वेळा विजय हजारे स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याच्या यादीत तमिळनाडूसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले.

बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे. आता विजय हजारे स्पर्धेत भारताच्या अनुभवी खेळाडूंनी काही सामने खेळून छाप पाडल्यानंतर युवकांना बाद फेरीत कौशल्य दाखवण्याची संधी आहे.

दरम्यान, मुंबईने क-गटातून दुसरे स्थान मिळवताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांनी सातपैकी पाच लढती जिंकल्या. अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईला पंजाबकडून एका धावेने पराभव पत्करावा लागला. त्याच लढतीत सर्फराझने अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक साकारले होते. शेवटच्या दोन साखळी सामन्यांत मुंबईचे नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे, तर शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे अनुभवी सिद्धेश लाडकडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तनुष कोटियन, शम्स मुलानी, मुशीर खान, अथर्व अंकोलेकर या खेळाडूंच्या कामगिरीवर मुंबईची भिस्त आहे.

दुसरीकडे, मयांक अगरवालच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कर्नाटकने अ-गटातून अग्रस्थान मिळवत आगेकूच केली. त्यांनी ७ पैकी ६ लढती जिंकल्या. डावखुरा सलामीवीर पडिक्कलने या स्पर्धेत ७ सामन्यांत सर्वाधिक ६४० धावा केल्या असून यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे. मयांक, स्मरणही फॉर्मात आहेत. त्याशिवाय त्यांची गोलंदाजीही लयीत आहे. कागदावर कर्नाटकचे पारडे जड वाटत आहे. त्यामुळे मुंबई त्यांना नमवून उपांत्य फेरी गाठणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

उत्तर प्रदेश-सौराष्ट्र आमनेसामने

बंगळुरूमध्येच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या दुसऱ्या मैदानात रंगणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत उत्तर प्रदेश व सौराष्ट्र आमनेसामने येतील. उत्तर प्रदेशने ब-गटात अग्रस्थान मिळवले, तर सौराष्ट्रने ड-गटातून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. मंगळवारी अन्य दोन उपांत्यपूर्व सामने होतील. पंजाबसमोर मध्य प्रदेशचे आव्हान असेल, तर दिल्लीची विदर्भाशी गाठ पडेल. त्यामुळे पुढील दोन दिवस रंगणाऱ्या या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

'संपूर्ण पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचाच'; लडाखच्या LG नी ठणकावले, शक्सगाम खोऱ्यावरील चीनचा दावा फेटाळला

अजित पवारांच्या 'डिझाईन बॉक्स'ची तपासणी! राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा; प्रचार संपल्यानंतर गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे खळबळ

ग्लॅमरचा पडदा, राजकीय अजेंडा हा मुलाखतींचा नवा 'पॅटर्न'; सेलिब्रिटींच्या मुलाखतींमधून मतदारांना भावनिक साद की राजकीय दिशाभूल..?

मुंबईसह राज्यातील २६-२७ मनपा आम्ही जिंकू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास

दुबार मतदार 'शिवशक्ती'च्या रडारवर; मतदानदिनी शिवसेना (ठाकरे गट) - मनसे युतीची 'हिट' पथके