मुंबई : कोणत्याही संघाचा कर्णधार नेमताना तो अधिक काळ तंदुरुस्त राहिला पाहिजे, हा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे असते. हार्दिक पंड्यासाठी तंदुरुस्ती हा चिंतेचा विषय राहिला आहे. तसेच कर्णधाराची निवड करताना ड्रेसिंग रूममधील मतांचाही विचार करण्यात आला. सूर्यकुमार यादवमध्ये एक यशस्वी कर्णधार होण्याची क्षमता आहे. त्यामुळेच हार्दिकऐवजी सूर्यकुमारची भारताच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिली.
२७ जुलैपासून रंगणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेला रवाना झाला. त्यापूर्वी नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आगरकर यांनी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधला. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ प्रत्येकी ३ टी-२० व एकदिवसीय सामने खेळणार आहे. रोहित शर्माने टी-२० प्रकारातून निवृत्ती जाहीर केल्यामुळे या मालिकेपासून मुंबईचा ३३ वर्षीय फलंदाज सूर्यकुमार भारताचे कर्णधारपद भूषवणार आहे. गंभीरच्या प्रशिक्षण कार्यकाळालासुद्धा या मालिकेद्वारे प्रारंभ होईल. त्याची प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच पत्रकार परिषद होती.
जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात ३० वर्षीय हार्दिक भारताचा उपकर्णधार होता. त्यामुळे तो कर्णधार होईल, असे भाकीत अनेकांनी वर्तवले होते. मात्र हार्दिकच्या तंदुरुस्तीचा मुद्दा आणि त्याच्यावरील कामाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्क लोड मॅनेजमेंट) करण्याच्या हेतूने बीसीसीआय तसेच निवड समितीने सूर्यकुमारला पसंती दिली. सूर्यकुमार जागतिक टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असून त्याने गतवर्षी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही भारताचे कर्णधारपद भूषवले होते.
कर्णधाराच्या मुद्द्याव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा यांना टी-२० संघात स्थान न लाभणे, शुभमन गिलला दोन्ही प्रकारांत देण्यात आलेले उपकर्णधारपद, रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून दिलेला डच्चू तसेच गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील संबंध यांसारख्या विविध मुद्द्यांवर गंभीर आणि आगरकर जोडीने दिलखुलास संवाद साधला. त्याचाच हा आढावा.
हार्दिकऐवजी सूर्यकुमार कर्णधार का?
आगरकर : निश्चितच याविषयी आम्ही सर्वांनी विचार केला. कोणत्याही संघाचा कर्णधार निवडताना त्याच्या कामगिरीपेक्षा तंदुरुस्तीलाही तितकेच महत्त्व द्यावे लागते. हार्दिकच्या कौशल्याविषयी कुणालाच शंका नाही. मात्र तंदुरुस्ती हा त्याच्यासाठी चिंतेचा विषय आहे. हार्दिकला किमान दोन प्रकारांत यापुढेही दडपण न बाळगता खेळता यावे, यादृष्टीने त्याच्यावरील कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच कर्णधारपदासाठी आम्ही ड्रेसिंग रूमममधील वातावरण व खेळाडू, प्रशिक्षकीय चमूच्या मताचाही आढावा घेतला. सूर्यकुमार गेल्या काही वर्षांपासून भारताच्या टी-२० संघाचा अविभाज्य घटक असून तो नक्कीच यशस्वी कर्णधार होऊ शकतो.
सूर्यकुमार एकदिवसीय संघात का नाही?
गंभीर : उपलब्ध असलेले खेळाडू आणि आम्ही आखलेल्या रणनीतीनुसार सूर्यकुमार भारताच्या एकदिवसीय संघात बसत नाही. त्याच्याकडून आम्हाला टी-२०मध्ये अधिक योगदान अपेक्षित आहे. २०२६च्या टी-२० विश्वचषकाचा विचार करता पुढील २ वर्षांत सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली आम्हाला उत्तम संघबांधणी करायची आहे. तो कर्णधार आणि फलंदाज म्हणून टी-२०मध्ये छाप पाडेल, अशी आशा आहे.
के. एल. राहुलकडे टी-२०मध्ये दुर्लक्ष का?
आगरकर : राहुल यापूर्वी भारताच्या टी-२० संघाचा उपकर्णधार होता, हे ठाऊक आहे. मात्र सध्या तो टी-२० संघाचा भाग नाही. मी निवड समिती अध्यक्ष झालो तेव्हा एकदिवसीय विश्वचषकावर सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे आम्ही राहुलविषयी फार चर्चा केली नाही. तसेच खेळाडूंची तंदुरुस्ती व वाढलेली स्पर्धा या बाबींवरही लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या राहुल एकदिवसीय व कसोटी प्रकारातच संघाचा भाग असेल.
ऋतुराज, अभिषेक यांना संघात स्थान का नाही?
आगरकर : दुर्दैवाने आम्हाला १५ खेळाडू निवडण्याचीच मुभा आहे. त्यामुळे काही खेळाडू चांगली कामगिरी करूनही संघाबाहेर राहतात. टी-२० विश्वचषकासाठी रिंकू सिंगला स्थान लाभले नाही, तेव्हाही हेच झाले होते. मात्र संघाचा ताळमेळ साधण्याच्या दृष्टीने ऋतुराज गायकवाड व अभिषेक शर्मा यांना स्थान लाभले नाही.
प्रशिक्षक म्हणून विराटशी तू कशाप्रकारे जुळवून घेशील?
गंभीर : विराटशी माझे मैदानाबाहेर फार चागंले नाते आहे. टीआरपी मिळवून देण्यासाठी आम्हा दोघांमध्ये वैर अथवा मतभेद असल्याचे अनेकदा दाखवले जाते. मात्र आमचे त्याने खासगी आहे. आम्हाला ते माध्यमांसमोर व्यक्त करण्यासारखे वाटत नाही. भारतीय संघाच्या हितासाठी आम्ही दोघेही एकत्रित आलो आहोत.
जडेजाला डच्चू का? शमीविषयी काही माहिती?
आगरकर : जडेजाला एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आलेला नाही, तर विश्रांती दिली गेली आहे. आम्ही याविषयी संघनिवडीच्या वेळेस स्पष्टता द्यायला हवी होती. तसेच जसप्रीत बुमरा व हार्दिक यांनाही एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिलेली आहे. तसेच मोहम्मद शमीने सरावाला प्रारंभ केला असून लवकरच तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल. सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपर्यंत शमी पूर्णपणे तंदुरुस्त असेल, अशी अपेक्षा आहे.
गिलकडे दोन्ही प्रकारांत उपकर्णधारपद का?
आगरकर : गिल हा तिन्ही प्रकारांतील खेळाडू आहे. त्याचे वय आणि तंदुरुस्ती ही बाब त्याच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. रोहित, सूर्यकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तो नेतृत्वाविषयी बरेच काही शिकेल. त्यामुळे भविष्याचा विचार करता त्याला संधी देण्यात आली आहे. मात्र गरज पडल्यास ऋषभ पंत, हार्दिक, राहुल हेसुद्धा नेतृत्वपदाच्या शर्यतीत कायम असतील.
वर्क लोड मॅनेजमेंटविषयी तुम्ही कोणती रणनिती आखली आहे?
गंभीर : जसप्रीत बुमरासारख्या गोलंदाजावरील कामाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्क लोड मॅनेजमेंट) करणे फार गरजेचे आहे. मात्र एखाद्या फॉर्मात असलेल्या फलंदाजाला मालिकेतील सर्व सामने खेळावे लागू शकतात. रोहित, विराट आता दोनच प्रकारांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार असल्याने ते अधिकाधिक सामन्यांसाठी उपलब्ध असावे, हेच माझे उद्दिष्ट आहे. वैयक्तिक कारणास्तव माघार घेणे आणि थकव्यामुळे माघार घेणे यामध्ये फरक आहे.
भविष्यातील वेगवान गोलंदाजांच्या फळीविषयी काही योजना आखली आहे का?
आगरकर : भारतीय वेगवान गोलंदाजांविषयी सध्या सगळीकडे चर्चा केली जाते, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. बुमरा, शमी, सिराज असे आघाडीचे वेगवान गोलंदाज आपल्या ताफ्यात आहेत. बीसीसीआयने वेगवान गोलंदाजांसाठी विशेष करार जाहीर करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय अकादमीत यापुढेही गोलंदाजांवर लक्ष देण्यात येईल. पुढील ३ ते ४ वर्षांत भारताची तितकीच सक्षम वेगवान गोलंदाजांची दुसरी फळी तयार करण्याचे आमचे लक्ष्य असेल.
नायर, डेस्काटे, बहुतुले हंगामी प्रशिक्षकीय चमूत
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. यावेळी मुंबईचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील साईराज बहुतुले हेसुद्धा भारतीय संघासह होते. नायर आणि नेदरलँड्सचा रायन टेन डेस्काटे श्रीलंका दौऱ्यासाठी सहाय्यक प्रशिक्षक असतील. तसेच बहुतुले हा वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करेल. टी. दिलीप यांच्याकडे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षकपद कायम ठेवण्यात आले आहे. गंभीरने स्वत: हा चमू फक्त श्रीलंका दौऱ्यापुरता असल्याचे सांगितले. श्रीलंका दौऱ्यानंतर संपूर्ण प्रशिक्षकीय फळीतील अंतिम नावे जाहीर करण्यात येतील.
भारताचा माजी अष्टपैलू नायर आणि डेस्काटे यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघात गंभीरसह काम केले आहे. गंभीर या संघाचा मार्गदर्शक होता, तर नायर व डस्काटे यांनी सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. कोलकाताने २०२४ची आयपीएल जिंकल्यानंतर आता हे त्रिकुट भारतीय संघाला आणखी शिखरावर नेण्यासाठी सरसावले आहे.
रोहित-विराट २०२७पर्यंत खेळणे अपेक्षित!
प्रशिक्षक गंभीरने पहिल्याच पत्रकार परिषदेत रोहित आणि विराट यांच्या भविष्याबाबतही मत मांडले. “रोहित व विराट यांनी तंदुरुस्ती टिकवून दोन्ही प्रकारांत खेळणे अपेक्षित आहे. पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी, जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि २०२७चा एकदिवसीय विश्वचषक पाहता हे दोन्ही खेळाडू भारतासाठी महत्त्वाचे असतील. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकात ते दोघेही खेळू शकतील, असे अपेक्षित आहे,” असे गंभीर म्हणाला.
गंभीर नव्हे; भारतीय संघ महत्त्वाचा!
“प्रशिक्षकपदी नेमणूक झाल्यापासून माझ्या स्पष्टवक्तेपणाविषयी तसेच कार्यशैलीविषयी सगळीकडेच चर्चा रंगते आहे, हे मला ठाऊक आहे. मात्र मीसुद्धा माणूस आहे. प्रत्येक वेळी माझी रणनीती यशस्वी ठरेल, असे नाही. मला पराभव मुळीच आवडत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूच्या मनात फक्त जिंकण्याचाच विचार कसा पेरायचा, याकडेच माझे लक्ष असेल. या काळात ड्रेसिंग रूममधील वातावरण जिंकण्याच्या मानसिकतेचेच असायला हवे. गंभीर आज असेल किंवा उद्या नसेल, परंतु भारतीय संघ जिंकत राहणे महत्त्वाचे,” असेही शेवटी गंभीरने नमूद केले आणि पत्रकारांचा निरोप घेतला.