चेन्नई : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महेंद्रसिंह धोनी चेन्नईकडून एकही सामना खेळू शकला नाही. त्यामुळे धोनीच्या पुढील भूमिकेबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू असलेल्या धोनीला चेन्नईने मैदानात न उतरवल्याने आता पुढील वर्षी धोनी प्रशिक्षकपदासाठी दावेदार समजला जात आहे.
आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद आगामी काळात एमएस धोनीकडे सोपवण्यास संघ व्यवस्थापन तयार असल्याचे संकेत चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी दिले आहेत. वय वर्षे ४४ असलेला माजी कर्णधार धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात ज्येष्ठ अनकॅप्ड खेळाडू आहे. मात्र चालू वर्षातील स्पर्धेत धोनी एकाही सामन्यात खेळायला मैदानात न उतरल्यामुळे त्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत तर्कवितर्क लावले जात होते. आगामी २०२६ चा हंगाम हा धोनीचा अखेरचा हंगाम असू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली असतानाच, संघ व्यवस्थापनाने धोनीच्या पुढील भूमिकेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथन यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, “धोनीसोबतच्या दीर्घकालीन कराराबाबत व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा केलेली नाही. धोनी नेहमीच आपले निर्णय स्वतः घेतो आणि संघ त्याच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतो. धोनीने भविष्यात खेळाडू, प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक अशा कोणत्याही भूमिकेत संघात राहावे, अशी चेन्नई सुपर किंग्सची इच्छा आहे.”
धोनीने चेन्नई सुपर किंग्ससोबत कोणत्या भूमिकेत जोडले जावे, हे पूर्णपणे त्याच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून असेल, असे विश्वनाथन यांनी सांगितले. स्टीफन फ्लेमिंगच्या जागी धोनी मुख्य प्रशिक्षक होणार का, यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, धोनी हा चेन्नईच्या संघाचा एक कायमस्वरूपी भाग आहे आणि भविष्यातील प्रत्येक निर्णय हा केवळ धोनीचाच असेल.
फ्लेमिंग यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
चेन्नईचा संघ सलग तिसऱ्यांदा आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरल्यामुळे सध्या मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच चेन्नईचा माजी स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन यानेही फ्लेमिंग यांच्या जागी धोनीला मुख्य प्रशिक्षक बनवण्याच्या कल्पनेला पाठिंबा दिला आहे.
...म्हणून धोनी होऊ शकतो मुख्य प्रशिक्षक
धोनीने चेन्नई सुपर किंग्सला आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले असून तो संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. चालू हंगामात मैदानावर न उतरताही त्याने संघातील तरूण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे संघाला आणि खेळाडूंना त्याच्यापेक्षा अधिक चांगले कोणीही ओळखू शकत नसल्याने, फ्लेमिंग यांच्याकडून धोनीकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवणे हा चेन्नईसाठी एक योग्य बदल ठरू शकतो.