महिलांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे भारताला यजमानपद; १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मुंबई, वडोदरा येथे होणार सामने Ojas C/Wikimedia Commons
क्रीडा

महिलांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे भारताला यजमानपद; १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मुंबई, वडोदरा येथे होणार सामने

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून भारताकडे सोपवले आहे. सहा देशांचा समावेश असलेली ही स्पर्धा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान मुंबई आणि वडोदरा येथे खेळवली जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून भारताकडे सोपवले आहे. सहा देशांचा समावेश असलेली ही स्पर्धा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान मुंबई आणि वडोदरा येथे खेळवली जाणार आहे.

श्रीलंकेतील क्रिकेट प्रशासनातील समस्यांमुळे त्यांना यजमानपदावरून वगळण्यात आले आहे. जुलैमध्ये झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत दिलेल्या सुधारणांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन श्रीलंका क्रिकेट करत असल्याने ही स्पर्धा आता भारतात घेण्याचा निर्णय आयसीसीने बुधवारी मान्य केला. बांगलादेश, भारत आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांच्या मूल्यांकनानंतर भारताची यजमान म्हणून शिफारस करण्यात आली, ज्यावर आयसीसी बोर्डाने २ सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब केले.

मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आणि वडोदरा येथील वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम या दोन ठिकाणी या ऐतिहासिक स्पर्धेचे सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे जागतिक दर्जाचे सहा संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ६ जुलैच्या टी-२० जागतिक क्रमवारीच्या कट-ऑफ तारखेनुसार हे सहा संघ पात्र ठरले असून, त्यांच्यात राऊंड-रॉबिन लीग सामने होतील. त्यातील अव्वल दोन संघ २८ फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी भिडतील.

भारताने गेल्या वर्षी महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले होते, ज्यामध्ये भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह याविषयी म्हणाले की, “महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ हा महिला क्रिकेटसाठी एक नवीन आणि उत्साहवर्धक अध्याय आहे. या पहिल्याच आवृत्तीमुळे जगातील सर्वोत्तम संघ एकत्र येतील आणि स्पर्धात्मकता वाढेल. आता दरवर्षी आयसीसीची प्रमुख महिला स्पर्धा होत असल्याने महिला क्रिकेटला एक नवी दिशा आणि गती मिळेल.”

एकूणच आयसीसीच्या या निर्णयामुळे महिला क्रिकेटला चालना मिळणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येईल की त्यांच्यासाठी अन्य ठिकाणी सामने होतील, हे पाहणे रंजक ठरेल.

हे महत्त्वाचे!

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना रंगण्याची शक्यता आहे. २०२५मध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर अंतिम सामना झाला होता. ब्रेबॉर्नवर २०२५मध्ये महिलांच्या डब्ल्यूपीएलचे सामने झाले होते. भारतासह सहा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. पाकिस्तानचा महिला संघदेखील या स्पर्धेसाठी भारतात येणे अपेक्षित आहे. टी-२० प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेद्वारे महिलांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे पहिले पर्व रंगणार असल्याने याची उत्सुकता लागून आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

मुंबईसह तीन विद्यापीठांत आता 'कुलपती पदक'; राज्यपालांच्या हस्ते मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

GSB गणपतीचे १२ सप्टेंबरपासून दर्शन; मंडळाने उतरवला ७०३ कोटींचा विमा

अस्सल पैठणीला आता बारकोड आणि लोगोचा साज! राज्य शासनाचा निर्णय; स्कॅन करताच मिळणार धागा, कारागीर आणि निर्मितीची माहिती

सरसकट बंदी नको, आवाजाची मर्यादा आखून द्या; पुण्यातील तरुणांनी सुचवला उपाय