मुंबई : आयपीएलच्या जेतेपदानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीचा बंगळुरूला अखेर फटका बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून आगामी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपदाचे हक्क हिरावून घेतले आहेत. त्याऐवजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आता विश्वचषकाच्या लढतींचे आयोजन करण्यात येईल.
भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांचा विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेतसुद्धा होतील. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत होतील. या विश्वचषकासाठी आता ४० दिवसांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असून एव्हाना अन्य सर्व स्टेडियमची तयारी पूर्ण झालेली आहे. तसेच तिकीट विक्रीला लवकरच प्रारंभ होणार आहे.
भारतातील बंगळुरू, गुवाहाटी, इंदूर आणि विशाखापट्टणम येथे विश्वचषकाचे सामने होणार होते, तर श्रीलंकेमध्ये कोलंबो येथे लढतींचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातही बंगळुरूच्या चिन्नास्वामीत तीन साखळी सामन्यांसह उपांत्य व अंतिम फेरी अशा एकूण पाच लढती होणे अपेक्षित आहे. मात्र आता चिन्नास्वामी स्टेडियमवरील या लढती डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. अन्य चार ठिकाणे मात्र कायम राखण्यात आली आहेत.
“काही तांत्रिक तसेच सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला विश्वचषकातील एक ठिकाण बदलावे लागत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमऐवजी आता नवी मुंबईत सामने होतील. येथील डी. वाय. पाटील स्टेडियम हे गेल्या काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघाचे घरचे तसेच हक्काचे मैदान म्हणून उदयास आले आहे. येथे महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) सामन्यांनाही उदंड प्रतिसाद लाभतो. त्यामुळेच या स्टेडियमची निवड करण्यात आली आहे,” असे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा म्हणाले.
नव्या वेळापत्रकानुसार डी. वाय. पाटीलवर भारताचे अनुक्रमे २३ व २६ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड व बांगलादेशशी सामने होतील. तसेच २० तारखेला श्रीलंका-बांगलादेश लढत येथे होईल. मग ३० ऑक्टोबरला दुसरा उपांत्य सामना, तर २ नोव्हेंबरला अंतिम सामना नवी मुंबईत होईल. जर पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली, तरच हा सामना कोलंबोत खेळवण्यात येईल.
चेंगराचेंगरी झाल्यापासून बंगळुरूतील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे बीसीसीआय व आयसीसी अन्य ठिकाणाच्या शोधात होते. तसेच ज्या-ज्या राज्यांमध्ये विश्वचषकातील सामने होणार आहेत, त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलिसांकडून सुरक्षेचे हमीपत्र बीसीसीआयला सुपूर्द करायचे होते. मात्र कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला हे जमले नाही. आयसीसीच्या नियमांनुसार ज्या स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने होतात, ते स्टेडियम तयारीसाठी किमान ३० दिवसांपूर्वीच आयसीसीला सोपवणे गरजेचे असते. त्यामुळे अखेरीस डी. वाय. पाटीलला पसंती देण्यात आली. बीसीसीआय केरळ राज्यातील थिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियममध्ये सामने स्थलांतरित करण्याच्या विचारात होती. मात्र यापूर्वीच्या लढतींमध्ये डी. वाय. पाटील स्टेडियमला लाभलेल्या चाहत्यांच्या पाठिंब्याचा विचार करता नवी मुंबईला प्राधान्य देण्यात आले, असे समजते.
चेंगराचेंगरीचे नेमके प्रकरण काय?
विराट कोहलीचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदा १८ वर्षांत प्रथमच आयपीएलचे जेतेपद मिळवले. ३ जून रोजी हा अंतिम सामना झाल्यानंतर ४ जून रोजी बंगळुरूतील विधानभवन ते चिन्नास्वामी स्टेडियम या मार्गात विजयी मिरवणूक काढण्यात येणार होती. मात्र स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी निर्माण झाली. यामध्ये ११ निष्पाप नागरिकांचा बळी गेला, तर ५० हून अधिक चाहते जखमी झाले. त्याचवेळी स्टेडियममध्ये कार्यक्रम सुरू होता. या मिरवणुकीसाठी सुरक्षाव्यवस्था पुरवण्याची क्षमता नसल्याचे बंगळुरूतील पोलिसांनी आधीच सांगितले होते. तसेच शासनाची परवानगी न घेतल्याचेही कर्नाटक सरकारने जाहीर केले. त्याशिवाय बंगळुरू संघाच्या मालकी चमूतील काही सदस्यांना अटकही करण्यात आले. तेव्हापासून चिन्नास्वामी स्टेडियम पूर्णपणे बंद आहे.
चिन्नास्वामीवर कायमस्वरूपी बंदी?
कर्नाटक क्रिकेट असोसिएशनतर्फे म्हैसूर येथे महाराजा करंडक टी-२० स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील सामनेसुद्धा आधी चिन्नास्वामीत होणार होते. तसेच कर्नाटक असोसिएशनने स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपेक्षा २० टक्के कमी चाहत्यांसह सामन्याचे आयोजन करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयपुढे ठेवला आहे. मात्र बीसीसीआय याच्याशी सहमत नाही. आता आयसीसी या स्टेडियमवर कायमस्वरूपी बंदी टाकण्याच्या विचारात आहे, असे समजते. भविष्यातही आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन चिन्नास्वामीला दिले, तर तेथील गर्दीवर नियंत्रण राखणे गरजेचे आहे. त्यामुळे स्टेडियमची प्रेक्षकक्षमता वाढवण्यात येणार का, हेसुद्धा पहावे लागेल. यासाठी कर्नाटकातील पोलिसांचीही राज्य क्रिकेट असोसिएशनला मदत लागेल.
या ठिकाणी होणार सामने
नवी मुंबई (डी. वाय. पाटील स्टेडियम) : ५ सामने (उपांत्य, अंतिम फेरीसह)
गुवाहाटी (बारस्परा स्टेडियम) : ५ सामने (उपांत्य लढतीसह)
विशाखापट्टणम (व्हीडीसीए स्टेडियम) : ५ साखळी सामने
इंदूर (होळकर स्टेडियम) : ५ साखळी सामने
कोलंबो (प्रेमदासा स्टेडियम) : ११ साखळी सामने (उपांत्य लढतीसह)
भारताचे साखळी सामने
३० सप्टेंबर वि. श्रीलंका (गुवाहाटी)
५ ऑक्टोबर वि. पाकिस्तान (कोलंबो)
९ ऑक्टोबर वि. दक्षिण आफ्रिका (विशाखापट्टणम)
१२ ऑक्टोबर वि. ऑस्ट्रेलिया (विशाखापट्टणम)
१९ ऑक्टोबर वि. इंग्लंड (इंदूर)
२३ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड (नवी मुंबई)
२६ ऑक्टोबर वि. बांगलादेश (नवी मुंबई)
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील.)