(Photo-X/@India_AllSports)
क्रीडा

विश्वचषक हॉकी स्पर्धा (महिला) : लढत गोलशून्य बरोबरीत, भारतीय महिला पुढील फेरीत; इंग्लंडचे तब्बल १२ पेनल्टी कॉर्नर रोखण्यात बचावपटूंना यश

भारतीय महिला संघाने एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी ड-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले.

Swapnil S

ॲम्स्टेलवीन : भारतीय महिला संघाने एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी ड-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले. यामुळे भारताने गटातून दुसऱ्या स्थानासह पुढील फेरीत प्रवेश केला. भारताचे गोलरक्षक सविता पुनिया व बिच्छू देवी यांनी छाप पाडली. तसेच बचावपटूंनीही कमाल केली. भारताने इंग्लंडचे तब्बल १२ पेनल्टी कॉर्नर रोखले. परिणामी इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे पुरुष आणि महिलांच्या हॉकी विश्वचषकाला प्रारंभ झाला. भारतीय महिला संघाने १९७४च्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून चौथा क्रमांक पटकावला होता. हीच भारताची विश्वचषकातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. आता सलिमा टेटेच्या नेतृत्वात भारतीय संघ ऐतिहासिक जेतेपदासाठी आतुर आहे. भारताने पहिल्या साखळी लढतीत चीनला बरोबरीत रोखले होते, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६-१ असा धुव्वा उडवला.

गुरुवारी तिसऱ्या साखळी लढतीत भारताला आगेकूच करण्यासाठी केवळ बरोबरीची गरज होती. ३ सामन्यांत १ विजय आणि २ बरोबरीच्या एकूण ५ गुणांसह भारताने हे आव्हान पेलले. आफ्रिकेचा ५-१ असा पराभव करून चीनने ७ गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवले. इंग्लंडला ४ गुणांसह तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. या निकालाने भारताचा पुढील प्रवेश निश्चित केला असला तरी संघाची कामगिरी अपेक्षेपेक्षा खालावलेली दिसली. पासिंग, चेंडूवरील नियंत्रण आणि पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरल्या. भारताला ६ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु दीपिका आणि नवनीत कौर यांना एकाचेही गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. त्यामुळे आक्रमणात सुधारणेला वाव आहे.

दुसरीकडे भारताच्या गोलरक्षक सविता पुनिया आणि बिच्छू देवी यांनी अप्रतिम बचाव केला. सामना संपण्यास अवघे ३० सेकंद बाकी असताना बिच्छू देवीने डाव्या बाजूला डायव्ह मारून इंग्लंडचा गोलचा प्रयत्न हाणून पाडला आणि भारताचे आव्हान कायम ठेवले. आता भारत आणि चीन दुसऱ्या फेरीत प्रत्येकी १ गुण घेऊन उतरतील. भारताच्या गटात आता नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलिया हे संघ असतील. शुक्रवारी भारताची गतविजेत्या नेदरलँड्सशी गाठ पडणार आहे. बाद फेरीत संघात मोठ्या सुधारणेची गरज असल्याचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी स्पष्ट केले.

नेदरलँड्सविरुद्ध आज लढत

महिलांच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांना शुक्रवारपासून प्रारंभ होईल. त्यांपैकी भारताचा शुक्रवारीच गतविजेत्या नेदरलँड्सविरुद्ध सामना होईल. भारताच्या गटात अ-गटातून नेदरलँड्स व ऑस्ट्रेलिया हे संघ आले आहेत. चीनदेखील भारताच्याच गटात असला, तरी साखळी फेरीत हे दोन संघ आधीच आमनेसामने आले होते. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा लढत होणार नाही.

हॉकी विश्वचषकात १६ संघ सहभागी झाले होते. त्यांची एका गटात चार याप्रमाणे चार गटांत विभागणी करण्यात आली होती. आता प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. त्यांपैकी अ आणि ड गटातील प्रत्येकी दोन संघांचा एक गट, तर ब आणि क गटातील चार संघांचा एक गट तयार करण्यात येईल. दुसऱ्या फेरीतून दोन्ही गटांतील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होतील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या वेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा; सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

मराठवाड्यात दाटले दुष्काळाचे ढग; ११ मोठ्या धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा

Mumbai : तीन वर्षांत एसी लोकलची तयारी; आयसीएफ १२०, आरसीएफ ७१, एमसीएफ ४७ रेक तयार करणार

महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र

व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी