दुबई : महिलांच्या टी-२० आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ कोणत्याही एका विशिष्ट विरोधी संघावर लक्ष केंद्रित न करता उत्कृष्ट क्रिकेट खेळण्यावर भर देईल, असे वक्तव्य भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने गुरुवारी केले. आशिया चषकाला शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिराती येथे सुरुवात होत आहे. भारतीय संघाची ३० तारखेला थायलंडशी सलामीची लढत होईल. आशियाई संघांचा दर्जा वेगाने सुधारत असल्याने ही स्पर्धा आव्हानात्मक असेल, अशी अपेक्षाही हरमनप्रीतने व्यक्त केली.
या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, विद्यमान विजेता श्रीलंका, बांगलादेश, यजमान संयुक्त अरब अमिराती, थायलंड, हाँगकाँग आणि इंडोनेशिया हे संघ सहभागी होत आहेत. एकदिवसीय सामन्यांचा विश्वविजेता असलेला भारतीय संघ या स्पर्धेत प्रबळ दावेदार म्हणून उतरत आहे. मात्र, ५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या बहुप्रतीक्षित सामन्याबाबत चाललेल्या चर्चेला हरमनप्रीतने जास्त महत्त्व दिले नाही. संघ बाह्य घटकांमुळे आपले लक्ष विचलित होऊ देणार नाही, असे सांगताना हरमनप्रीतने एका विशिष्ट संघावर लक्ष केंद्रित करत नसून प्रत्येक संघाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे नमूद केले.
पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन करणार का, या प्रश्नावर तिने कोणतेही उत्तर दिले नाही. या स्पर्धेकडे दबावाच्या परिस्थितीत स्वतःची चाचणी घेण्याची आणि कौशल्याचा विकास करण्याची संधी म्हणून पाहिले जात असल्याचे तिने सांगितले. गेल्या दोन-तीन वर्षांत सर्वच आशियाई संघांमध्ये मोठी सुधारणा झाली असून ते कोणतीही गोष्ट सहजासहजी देणार नाहीत, असे तिने स्पष्ट केले. संघ निवडीवर माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, आम्ही सर्वोत्तम संघ निवडला असून सर्व खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली आहे, असे सांगत तिने संघाचे समर्थन केले.
दरम्यान, पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने आपला संघ ५ सप्टेंबरच्या सामन्याचा आनंद घेईल आणि निर्भय क्रिकेट खेळेल, असे सांगितले.