संग्रहित छायाचित्र छायाचित्र : (एक्स)
क्रीडा

भारताचे मिशन टी-२० वर्ल्डकप! महिलांची सलामीची लढत आज

Swapnil S

दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तीन महिन्यांपूर्वी टी-२० विश्वचषकाला गवसणी घातल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाकडूनही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. भारताच्या मिशन टी-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होणार असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना शुक्रवारी न्यूझीलंडशी होणार आहे.

१० संघांमध्ये रंगणारी ही स्पर्धा यंदा शारजा आणि दुबई येथे खेळवण्यात येत आहे. हरमनप्रीत आपला शेवटचा टी-२० वर्ल्डकप खेळत आहे. अनेक वेळा जेतेपदाच्या जवळ जाऊनही भारतीय संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली असून यावेळेला नक्कीच विश्वचषकावर नाव कोरणार, या इराद्याने हरमनप्रीतसह भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. २०२०मध्ये मेलबर्न येथे झालेल्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारतीय महिला संघाने हे शल्य मागे सारून आता नव्याने संघाची बांधणी केली आहे. भारतीय संघात आता गुणवत्तेची कुठलीही कमी नाही. सहा वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला तगडी टक्कर देऊ शकतील, इतकी क्षमता आताच्या भारतीय संघात नक्कीच आहे.

बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) भारतीय महिला संघाचे शिबीर सुरू होते, त्यावेळी खेळाडूंना मार्गदर्शनपर शिबिरात दबावाखाली कामगिरी कशी उंचवायची, याबाबत मोलाचे सल्लेही देण्यात आले. मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने प्रत्येक प्रतिस्पर्ध्यासाठी नवनवीन रणनीती आखल्या आहेत.

न्यूझीलंडपेक्षा भारतीय महिला संघ सरस असला तरी कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक भारत करणार नाही. न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून तांत्रिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या आपण किती सक्षम आहोत, याची प्रचिता भारतीय संघाला येणार आहे. भारताच्या अ गटात न्यूझीलंडसह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि पाकिस्तानचा समावेश आहे. ३५ वर्षीय हरमनप्रीतसह स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या अव्वल पाच खेळाडूंकडून भारताला दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

सध्या शफाली आणि स्मृती चांगल्या फॉर्मात असून त्यांनी जुलै महिन्यात झालेल्या आशिया चषकात दमदार फलंदाजी केली होती. मात्र अंतिम फेरीत भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते. स्मृती मानधनाने पाच टी-२० सामन्यांत तीन वेळा अर्धशतकी खेळी साकारल्या आहेत. यूएईमध्ये सध्या खेळाडूंना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत असल्यामुळे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

गोलंदाजीत भारतीय संघाची प्रामुख्याने भिस्त ही फिरकी गोलंदाजीवर असेल. रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार आणि अरुंधती रेड्डी या तीनच वेगवान गोलंदाज संघात आहेत. त्यापैकी दोन जणींना अंतिम संघात स्थान मिळेल. म्हणजेच भारताला प्रत्येक सामन्यात तीन फिरकीपटूंना संधी द्यावी लागेल. ऑफस्पिनर दीप्ती शर्मा, श्रेयांका पाटील तसेच लेगस्पिनर आशा शोभना आणि डावखुरी फिरकीपटू राधा यादव यांच्या गोलंदाजीवर भारताची मदार असेल. न्यूझीलंडकडेही युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार सोफी डिव्हाईन हिच्यासह अष्टपैलू सुझी बेट्स, अनुभवी वेगवान गोलंदाज ली ताहूहू आणि लाय कास्परेक यांच्याकडून न्यूझीलंडला दमदार कामगिरीची आशा आहे. तसेच युवा अष्टपैलू अमेलिया केर हिच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा किवींना आहे.

हातात तिरंगा, ट्रॉफी घेऊनच भारतात परतू - हरमनप्रीत

रोहितसेनेने जशी कमाल केली, आमचेही तेच ध्येय आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आमची चांगली तयारी झाली असून आम्ही जेतेपदाच्या दिशेने सकारात्मक आहोत. आमच्यातील सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हीच आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे, असे आम्ही ड्रेसिंगरूममध्ये नेहमी सांगत असतो. तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ करा, असा सल्ला मी संघातील सर्व खेळाडूंना दिला आहे. त्यामुळे ही स्पर्धा संपल्यानंतर मायदेशी परतताना आमच्या हातात तिरंगा आणि विश्वचषकाची ट्रॉफी नक्कीच असेल अशी अपेक्षा आहे, असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सांगितले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चुका टाळाव्या लागतील -स्मृती मानधना

भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिला टी-२० विश्वचषकाला सुरुवात होण्याआधीच ऑस्ट्रेलियाची भीती सतावत आहे. “आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणे हे आमच्यापुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागणार आहे. गटातील श्रीलंका आणि न्यूझीलंड हे संघसुद्धा जेतेपदासाठी दावेदार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याविषयीची उत्सुकता आहे,” असे स्मृती म्हणाली.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, संजना संजीवन.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवा; शरद पवार यांची केंद्र सरकारला सूचना

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय