क्रीडा

विश्वविजयाच्या दृष्टीने तयारी पूर्ण; भारताची कर्णधार हरमनप्रीतला विश्वास, टी-२० वर्ल्डकपसाठी संघ यूएईला रवाना

टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाजूंवर आम्ही तयारी केली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केली.

Swapnil S

मुंबई : टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाजूंवर आम्ही तयारी केली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केली. संयुक्त अरब अमिराती येथे ३ ते २० ऑक्टोबरमध्ये रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी मंगळवारी मुंबई येथून भारतीय संघ यूएईला रवाना झाला.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने २०२०च्या टी-२० विश्वचषकाची प्रथमच अंतिम फेरी गाठली होती, मात्र तेथे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२३च्या टी-२० विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत पराभूत झाला. तसेच नुकताच भारताला आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेने नमवले. मात्र आता पुन्हा एकदा नव्या जोमाने हरमनप्रीतच्या रणरागिणी जगज्जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेसाठी प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि निवड समिती अध्यक्ष नीतू डेव्हिडसुद्धा उपस्थित होत्या.

“यंदा आम्ही सर्वोत्तम संघासह टी-२० विश्वचषकात सहभागी होत आहोत, असे मला वाटते. या संघांतील बहुतांश खेळाडू गेल्या काही काळापासून एकत्रितपणे खेळत आहे. प्रत्येकाला आपल्यावरील जबाबदारीची जाणीव आहे. सरावादरम्यान आम्ही सर्व बाजूंवर काम केले आहे. त्यामुळे जेतेपद मिळवण्याची ही उत्तम संधी आहे,” असे ३५ वर्षीय हरमनप्रीत म्हणाली. जुलै महिन्यात भारतीय संघ अखेरचा टी-२० सामना खेळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महिला संघातील खेळाडू बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहेत.

“आशिया चषकात आम्ही चांगला खेळ केला. मात्र अंतिम फेरीत श्रीलंकेने आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली. ते अपयश बाजूला सारून आम्ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या विश्वचषकाच्या आव्हानासाठी तयार आहोत,” असेही हरमनप्रीतने सांगितले. भारताचा अ-गटात समावेश असून ते ४ तारखेला न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीने अभियानाची सुरुवात करतील. १० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी ५ संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील.

टी-२० विश्वचषकाचे गट

अ-गट : भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका

ब-गट : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, स्कॉटलंड

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

कूपर रुग्णालयात 'फायर सेफ्टी बॉल' बसवणार; आग प्रतिबंधक तयारी अधिक मजबूत होणार

छठ पूजेमुळे 3 हजार कोटींची उलाढाल; BMC सज्ज

उलवेमध्ये घर खरेदीदारांची फसवणूक प्रकरण : विकासक गोराडिया दाम्पत्याला जामीन मंजूर

स्लीपर बसमधून प्रवास करताय हे लक्षात ठेवा; एसटीची सुरक्षा जनजागृती मोहीम सुरु