Photo : X
क्रीडा

ICC Women's World Cup 2025 : महिलांच्या विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा

३० सप्टेंबरपासून रंगणारी महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आणि त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी मंगळवारी भारतीय महिला संघाची घोषणा केली जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : ३० सप्टेंबरपासून रंगणारी महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आणि त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी मंगळवारी भारतीय महिला संघाची घोषणा केली जाणार आहे.

भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे (५० षटकांचा) आयोजन करणार आहेत. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. त्यांपैकी भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. मात्र यावेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात महिला संघ जेतेपद मिळवेल, अशी आशा आहे.

महिलांच्या निवड समितीच्या अध्यक्ष नितू डेव्हिड व अन्य सदस्य मुंबईतील बीसीसीआयच्या कार्यालयात भेटणार आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत संघाची घोषणा करण्यात येईल, असे अपेक्षित आहे. त्यापूर्वी दुपारी २ वाजेपर्यंत आशिया चषकासाठी भारताचा पुरुष संघ जाहीर केला जाऊ शकतो. १४ ते २० सप्टेंबर या कालावधीत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ एकदिवसीय सामने होतील.

शफालीचे पुनरागमन की प्रतिकाला संधी ?

युवा सलामीवीर शफाली वर्माने भारताच्या एकदिवसीय संघातील स्थान गमावले होते. मात्र डब्ल्यूपीएलद्वारे तिने पुन्हा लक्ष वेधले. तसेच भारत-अ संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यावर तिने चांगली कामगिरी केली. शफालीच्या अनुपस्थितीत प्रतिका रावल व स्मृती मानधना सलामीवीरांची भूमिका बजावत आहेत. प्रतिकाने १४ सामन्यांत ५४च्या सरासरीने आतापर्यंत ७०३ धावा केल्या आहेत. त्यामुळे तिला वगळणेही चुकीचे ठरू शकेल. गोलंदाजीत भारताला रेणुका सिंग व पूजा वस्त्रकार यांच्या तंदुरुस्तीची चिंता आहे. फिरकी विभागात दीप्ती शर्मा, मिन्नू मणी व राधा यादव यांची निवड पक्की मानली जात आहे. फलंदाजीत हरमनप्रीत, स्मृती, जेमिमा रॉड्रिग्ज व हरलीन देओल यांच्यावर मदार असेल. रिचा घोष व यास्तिका भाटिया यष्टिरक्षणाचे पर्याय आहेत.

मुंबईसाठी पुढचे तीन तास महत्त्वाचे; संध्याकाळी समुद्राला येणार भरती, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

नांदेडमध्ये पावसाने घरं उध्वस्त; आमदार पोहचले २४ तासांनी, ग्रामस्थांचा संताप

Mumbai Rain Update : ६ तासांत सांताक्रूझमध्ये विक्रमी पर्जन्यमान; १५१ मिमी पावसाची नोंद

मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन थांबली; मध्य आणि हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प, पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सुरू

मुंबईकरांनो सावधान! मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी