नवी मुंबई : भारतीय महिला संघाला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या उपांत्य लढतीपूर्वी जबर धक्का बसला आहे. भारताची २५ वर्षीय सलामीवीर प्रतिका रावल उजव्या पायाच्या दुखापतीमुळे उर्वरित विश्वचषकाला मुकणार आहे. त्यामुळे प्रतिकाच्या जागी २१ वर्षीय आक्रमक फलंदाज शफाली वर्माचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने सात सामन्यांतील ३ विजय, १ रद्द लढत अशा एकूण ७ गुणांसह चौथे स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली. भारताची रविवारी झालेली बांगलादेशविरुद्धची अखेरची साखळी लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. बांगलादेशच्या ११९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने बिनबाद ५७ धावा केल्या असताना पावसाचे आगमन झाले व लढत अखेरीस रद्द करण्यात आली. मात्र याच सामन्यातील २१व्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूमागे धावणाऱ्या प्रतिकाचा उजवा पाय मैदानात काहीसा अडकला व तिच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे तिला मैदान सोडावे लागले. प्रतिकाच्या अनुपस्थितीत अमनजोत कौर सलामीला आली होती.
प्रतिकाने यंदाच्या विश्वचषकात ६ सामन्यांत ५१च्या सरासरीने ३०८ धावा केल्या होत्या. यामध्ये न्यूझीलंडविरुद्धचे शतक, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ७५ धावांचा समावेश होता. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत स्मृती मानधनानंतर (३६५) प्रतिकाच दुसऱ्या स्थानी होती. मात्र आता तिच्या संघात नसल्याचा भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फटका बसू शकतो. शफालीला डावलूनच सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या प्रतिकाला संघात प्राधान्य दिले होते.
शफाली ऑक्टोबर २०२४मध्ये भारतासाठी अखेरचा एकदिवसीय सामना खेळली आहे. ती टी-२० व कसोटी संघात सलामीवीर म्हणून पक्की असली, तरी एकदिवसीयमध्ये तिने २९ सामन्यांत फक्त ४ अर्धशतके साकारताना ६४४ धावा केल्या आहेत. त्याउलट प्रतिकाने २४ सामन्यांत ७ अर्धशतके व २ शतकांसह १,११० धावा केल्या आहेत. त्यामुळे शफालीला थेट अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळाल्यास स्मृतीच्या साथीने उत्तम सुरुवात करून देण्याचे आव्हान तिला पेलावे लागणार आहे.
भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांच्या विश्वचषकाचे १३वे पर्व रंगत असून या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत झाले. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत झाल्या. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले असून भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नव्हती.
भारताने या स्पर्धेत श्रीलंका व पाकिस्तान यांना नमवून दणक्यात सुरुवात केली होती. मात्र दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन बलाढ्य संघांकडून भारताला पराभव पत्करावा लागला. त्यातही आफ्रिका व इंग्लंडविरुद्धचा पराभव अधिक जिव्हारी लागणारा ठरला, कारण एकवेळ भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. त्यामुळे चाहत्यांकडून होणारी टीका व अपेक्षांचे दडपण झेलून भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध लौकिकाला साजेशी खेळी करत उपांत्य फेरी गाठली. दरम्यान, २९ ऑक्टोबरपासून उपांत्य फेरीला प्रारंभ होणार असून अनुक्रमे गुवाहाटी व नवी मुंबई येथे या लढती होतील. बुधवारी इंग्लंड व आफ्रिका आमनेसामने येतील, मग गुरुवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. २ नोव्हेंबरला नवी मुंबईतच अंतिम सामना रंगणार आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
हरलीन सलामीसाठी उत्तम पर्याय : मिताली
भारताची माजी कर्णधार मिताली राजने हरलीन देओल सलामीसाठी उत्तम पर्याय असू शकते, असे सुचवले आहे. हरललीने या विश्वचषकात प्रामुख्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आतापर्यंत ५ सामन्यांत १६९ धावा केल्या आहेत. मात्र तिला अर्धशतकाने दोनदा हुलकावणी दिली. तसेच तिच्या स्ट्राइक रेटवरूनही चर्चा सुरू असते. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन शफाली व हरलीनपैकी कोणाला पसंती देणार, हे पाहणे रंजक ठरेल.