क्रीडा

कुस्तीची हंगामी समिती बरखास्त, भारतीय कुस्ती महासंघाकडे पुन्हा अधिकार; पंतप्रधान मोदींवर विनेशचा निशाणा

भारतीय कुस्ती महासंघाने निवडणूक घेतल्यानंतर चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने आधी नव्या कार्यकारिणीचे निलंबन केले आणि मग भारतीय ऑलिम्पिक संघटनेने हंगामी समितीची नियुक्ती केली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) भारतीय कुस्तीचा कार्यभार सांभाळण्यासाठी नियुक्त केलेली हंगामी समिती बरखास्त करण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता देशातील कुस्तीबाबतचे सर्व निर्णय पुन्हा संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कुस्ती महासंघाकडून (डब्ल्यूएफआय) घेतले जाणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठविण्यात आल्यामुळे आता हंगामी समितीची गरज नाही. भारतीय कुस्ती महासंघाला त्यांचे प्रशासकीय अधिकार परत मिळाले आहेत, असे ‘आयओए’ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले.

पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेकरिता घेण्यात आलेल्या निवड चाचणीसाठी हंगामी समितीने भारतीय कुस्ती महासंघाबरोबर काम केले. या चाचणीच्या यशस्वी आयोजनानंतर लगेचच ‘आयओए’ने हंगामी समिती विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी महासंघाच्या संविधानातील नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवताना क्रीडा मंत्रालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नव्या कार्यकारिणीला निलंबित केले होते. त्यानंतर कुस्ती महासंघाचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी ‘आयओए’ने हंगामी समितीची स्थापना केली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन मागे घेतल्यामुळे हंगामी समितीला धक्का बसला होता.

‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने उठवलेली बंदी आणि हंगामी समितीने यशस्वी पार पाडलेली निवड चाचणी याच्या पार्श्वभूमीवर हंगामी समिती बरखास्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १० मार्च रोजी घेण्यात आला, असे ‘आयओए’ने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. निवडून आलेल्या कार्यकारिणीला काम करण्याची परवानगी दिल्याबद्दल महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी ‘आयओए’चे आभार मानले आहेत.

‘‘भारतीय कुस्ती महासंघाचे काम करण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही देशातील एकाही कुस्तीपटूंवर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही लवकरच राष्ट्रीय कुस्ती शिबिराचे आयोजन करणार असून, सध्या केवळ ऑलिम्पिक पात्रतेवर लक्ष केंद्रित केले आहे. भारताचे पाच ते सहा कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील असा विश्वास आहे,’’ असे संजय सिंह म्हणाले.

क्रीडा मंत्रालयाने केलेल्या निलंबनाचे काय?

भारतीय कुस्ती महासंघाने निवडणूक घेतल्यानंतर चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने आधी नव्या कार्यकारिणीचे निलंबन केले आणि मग भारतीय ऑलिम्पिक संघटनेने हंगामी समितीची नियुक्ती केली. आता हंगामी समिती बरखास्त करण्याचा निर्णय झाला असला, तरी क्रीडा मंत्रालयाच्या निलंबनाच्या कारवाईचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रीडा मंत्रालयाने याबाबत कुठल्याही प्रकारचे थेट विधान केलेले नाही. त्यामुळे याबाबतचा संभ्रम कायम आहे.

पंतप्रधान मोदींवर विनेशचा निशाणा

भारतीय कुस्ती महासंघ पुन्हा एकदा सत्तेत आल्याने कुस्तीपटू विनेश फोगटने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “आपले पंतप्रधान हे ‘स्पिन मास्टर’ आहेत. विरोधकांच्या भाषणांना प्रत्युत्तर देताना ते ‘महिला शक्ती’ या शब्दाचा सातत्याने वापर करतात. मात्र महिलांवर अत्याचार करणारा बृजभूषण एकीकडे पुन्हा सत्तेत आला आहे. मग यावेळी मोदींची महिला शक्ती कुठे आहे? कृपया पंतप्रधानांनी महिलांचा फक्त ढाल म्हणून वापर करू नये, तर देशातील क्रीडा संघटनांकडून महिला खेळाडूंचा बचाव व्हावा, यासाठीही प्रयत्न करावे,” असे रोखठोक ट्वीट विनेशने केले आहे. तिला साक्षी मलिकचाही पाठिंबा लाभत आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय - उद्धव ठाकरे