क्रीडा

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय युवा संघाची आज बांगलादेशशी गाठ

युवा ‌विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी भारताची दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशशी गाठ पडणार आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबवर उभय संघांतील ही ब-गटातील लढत रंगणार आहे.

Swapnil S

बुलावायो : युवा ‌विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी भारताची दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशशी गाठ पडणार आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबवर उभय संघांतील ही ब-गटातील लढत रंगणार आहे.

झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे १५ जानेवारीपासून युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. मुंबईचा १८ वर्षीय आयुष म्हात्रे या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. आयपीएलपासून लक्ष वेधणारा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीसुद्धा भारतीय संघाचा सदस्य आहे. भारताने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. भारताचा ब-गटात समावेश करण्यात आला असून त्यांनी गुरुवारी झालेल्या पहिल्या साखळी लढतीत अमेरिकेवर ६ गडी राखून मात केली. आता बांगलादेशला नमवून भारताला सुपर सिक्स फेरीतील स्थान पक्के करण्याची संधी आहे. २४ तारखेला भारताची अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडशी गाठ पडेल. त्यामुळे भारताला अग्रस्थानाची संधी आहे.

दरम्यान, एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यांपैकी प्रत्येकी गटातील आघाडीचे तीन संघ सुपर-सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-सिक्समध्ये मग सहा-सहा संघांचे दोन गट बनवण्यात येतील. येथे प्रत्येक संघ आपल्या आधीच्या गटातील संघांविरुद्ध न खेळता अन्य गटातून आलेल्या तीन संघांशी खेळणार आहे.

सुपर-सिक्स फेरीतील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ६ तारखेला अंतिम सामना रंगेल. यंदा या विश्वचषकाचे हे १६वे पर्व आहे. भारताने सर्वाधिक ५ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. २०२४मध्ये मात्र भारताला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यंदा भारत जेतेपद पटकावेल, अशी आशा आहे. २०२२मध्ये भारताने यश धूलच्या नेतृत्वात अखेरचा युवा विश्वचषक उंचावला होता.

वेळ : दुपारी १ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ हॉटस्टार ॲप

आजचे राशिभविष्य, २१ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

नऊवारी, नथ अन् मराठमोळा साज; माधवी निमकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हाताने ते चमच्याने

मनाला सुखावणारं कुसबे

एआय निसर्गाचा नवा दोस्त!