क्रीडा

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा; मुशीरचा पुन्हा शतकी नजराणा, भारतीय युवा संघाची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल

मुंबईकर मुशीर खानने (१२६ चेंडूंत १३१ धावा) साकारलेल्या आणखी एका शतकाच्या बळावर भारताने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा तब्बल २१४ धावांनी फडशा पाडला.

Swapnil S

ब्लोमफोंटेन : मुंबईकर मुशीर खानने (१२६ चेंडूंत १३१ धावा) साकारलेल्या आणखी एका शतकाच्या बळावर भारताने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा तब्बल २१४ धावांनी फडशा पाडला. ‘सुपर-सिक्स’ फेरीतील या सामन्यात डावखुरा फिरकीपटू सौम्य पांडेनेसुद्धा १९ धावांत ४ बळी पटकावून भारतासाठी उत्तम योगदान दिले. त्यामुळे भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार वाटचाल केली आहे.

उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २९५ धावांपर्यंत मजल मारली. १८ वर्षीय मुशीरने १३ चौकार व ३ षटकारांसह स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले. मुशीरने साखळी फेरीत आयर्लंडविरुद्ध ११८ धावा केल्या होत्या. सलामीवीर आदर्श सिंग (५२) व उदय (३४) यांनीही मोलाचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून मॅसोन क्लार्कने चार बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २८.१ षटकां ८१ धावांत गारद झाला. बांगलादेशविरुद्ध चार बळी पटकावणाऱ्या सौम्यने यावेळीही चार जणांना माघारी पाठवले. त्याला राज लिंबानीने (१७ धावांत २ बळी) सुयोग्य साथ दिली. मुशीरने गोलंदाजीतही छाप पाडताना दोन बळी मिळवले. कर्णधार ऑस्कर जॅक्सनने किवींसाठी सर्वाधिक १९ धावा केल्या. भारताचा आता पुढील सामना २ फेब्रुवारी रोजी नेपाळशी होईल. भारत ‘सुपर-सिक्स’ फेरीत ६ गुणांसह अ-गटात अग्रस्थानी आहे. भारताने सलग तिसऱ्या लढतीत २०० धावांच्या फरकाने विजय मिळवला, हे विशेष.

खान बंधूंसाठी अच्छे दिन

मुशीरचा मोठा भाऊ सर्फराझची सोमवारीच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली. त्यानंतर आता मंगळवारी मुशीरनेसुद्धा शतक झळकावून स्वत:चे कौशल्य सिद्ध केले. त्यामुळे वडील नौशाद खान हे आपल्या दोन्ही मुलांवर प्रचंड खूष असून लवकरच ते दोघे एकत्रित भारतासाठी खेळावेत, अशी इच्छाही त्यांनी वर्तवली आहे. एकूणच सध्या खान बंधूंसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

मुशीरने या स्पर्धेत सर्वाधिक ३२५ धावा केल्या आहेत. त्याने चार सामन्यांत अनुक्रमे ३, ११८, ७३, १३१ अशा धावा केल्या आहेत.

सौम्य पांडेने या स्पर्धेत सर्वाधिक १२ बळी मिळवले आहेत. त्याने चार सामन्यांत अनुक्रमे ४/२४, ३/२१, १/१३, ४/१९ अशी कामगिरी केली आहे.

१३१

मुशीर खान

१२६ चेंडू

१३ चौकार

३ षटकार

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते