क्रीडा

ICC T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेला पावसाचा दिलासा, ऑस्ट्रेलियाला जबर तडाखा! आयर्लंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने विश्वचषकाच्या सुपर-आठ फेरीत धडक

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी वरुणराजा म्हणजेच पाऊस झिम्बाब्वेचा मित्र म्हणून उदयास आला. तर हाच पाऊस ऑस्ट्रेलियासाठी वैरी ठरला.

Swapnil S

पाल्लेकेले : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी वरुणराजा म्हणजेच पाऊस झिम्बाब्वेचा मित्र म्हणून उदयास आला. तर हाच पाऊस ऑस्ट्रेलियासाठी वैरी ठरला. आयर्लंडविरुद्धची ब-गटातील साखळी लढत पावसामुळे रद्द झाल्याने झिम्बाब्वेने प्रथमच टी-२० विश्वचषकाच्या सुपर-आठ फेरीत प्रवेश केला, तर ऑस्ट्रेलिया, आयर्लंड यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.

दरम्यान, साखळी फेरीचा थरार आता अंतिम टप्प्यात आहे. ब-गटातून सोमवारी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारून सलग तिसरा विजय नोंदवतानाच सुपर-आठ फेरी गाठली. त्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी झिम्बाब्वे, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया या सर्वांमध्ये शर्यत होती. त्यातच झिम्बाब्वेने दोन पैकी दोन लढती जिंकलेल्या असल्याने त्यांना किमान एक लढत जिंकणे किंवा रद्द लढतीद्वारे एक गुण मिळवणे आगेकूच करण्यासाठी पुरेसे ठरणार होते.

ऑस्ट्रेलियाचा अखेरचा सामना ओमानशी होणार असून त्यांनी ती लढत जिंकली, तरी ते ४ सामन्यांत ४ गुणांपर्यंतच पोहचू शकतात. झिम्बाब्वेने मात्र मंगळवारच्या रद्द लढतीद्वारे ३ सामन्यांत ५ गुण कमावले आहेत. तीन तासांहून अधिक काळ प्रतीक्षा करूनही पाल्लेकेले येथे पाऊस न थांबल्याने पंचांनी सामना रद्द करत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल केला. त्यामुळे आयर्लंडला ४ सामन्यांत ३ गुणांवर समाधान मानावे लागल्याने त्यांचेही आव्हान संपुष्टात आले. आता झिम्बाब्वेची अखेरची साखळी लढत श्रीलंकेशी होईल. या लढतीच्या निकालाचा दोन्ही संघांवर काहीही फरक होणार नाही. कारण झिम्बाब्वे सुपर-आठ फेरीत पहिल्या गटात असेल, तर श्रीलंका दुसऱ्या गटात दाखल झाली आहे.

मुख्य म्हणजे २०२४मध्ये झिम्बाब्वे विश्वचषकासाठी पात्रदेखील ठरू शकलेला नव्हता. मात्र यावेळी त्यांनी ओमान व नंतर ऑस्ट्रेलियाला धूळ चारून अनपेक्षित आगेकूच केली. त्यामुळे मिचेल मार्शच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियावर साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. २००९ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया साखळी फेरीत गारद झाली, हे विशेष.

त्यामुळेच आता झिम्बाब्वेपासून सुपर-आठ फेरीतही अन्य संघांना सावध रहावे लागणार आहे. बुधवारी पाकिस्तान-नामिबिया लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारताच्या सुपर-आठ फेरीतील लढती

  • रविवार, २२ फेब्रुवारीला भारताची सुपर-आठ फेरीतील पहिल्या लढतीत आफ्रिकेशी गाठ पडेल. अहमदाबाद येथे ही लढत होईल.

  • मग २६ तारखेला भारताचा दुसरा सामना झिम्बाब्वेशी होईल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही लढत होईल.

  • त्यानंतर १ मार्च रोजी भारताचा वेस्ट इंडिजशी कोलकाता येथे मुकाबला होईल. सुपर-आठ फेरीत ३ पैकी किमान २ सामने जिंकणे गरजेचे असेल.

सुपर-आठचे दोन गट

  • पहिला गट : भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका

  • दुसरा गट : श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड, चौथा संघ?

आता फक्त एका संघाची प्रतीक्षा

सुपर-आठ फेरीत आठ संघांना दोन गटांत विभागण्यात येणार आहे. त्यांपैकी ७ संघ ठरलेले आहेत. पहिल्या गटात भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ आहेत. आता फक्त साखळी फेरीच्या अ-गटातील दुसरा संघ ठरणे बाकी आहे. यासाठी पाकिस्तान, अमेरिका यांच्यात चुरस आहे. या दोघांपैकी एक जण सुपर-आठ फेरीतील दुसऱ्या गटात दाखल होईल. पाकिस्तानची बुधवारी नामिबियाशी लढत होणार आहे.

एका अंध जोडप्याच्या डोळस प्रेमाची दास्तान; मुस्लिम मैत्रिणीच्या सुटकेसाठी रामकृपाल न्यायालयात

ज्येष्ठ नागरिक, वाहकामध्ये वादावादी; एसटीत स्वच्छता अधिभार लागू

...तर भाडेकरू बनतो सहमालक; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंब्य्रात 'कैसा फसाया'ची चर्चा; जात प्रमाणपत्र प्रकरणी सहार शेख अडचणीत

राज्यात शनिवारपासून अवकाळीचा इशारा; अकोल्यात उष्माघाताचा बळी