ठाणे

उल्हासनगरमधील 15 नगरसेवक शिंदे गटात सहभागी

ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर सहभागी झाल्याने शिंदे गटाचे पारडे जड

नवनीत बऱ्हाटे

ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ नंतर आता उल्हासनगर शहरातही शिवसेनेच्या १५ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आपले समर्थन जाहीर केले आहे. बुधवारी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने उल्हासनगरातील माजी नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील आनंदाश्रम येथे हजेरी लावली. त्यातच उल्हासनगर शहरातील शिवसेनेचे जेष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर हे देखील शिंदे गटात सहभागी झाल्याने उल्हासनगरात शिंदे गटाचे पारडे जड झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना ठाणे जिल्ह्यात विरोध होईल असे वाटत नव्हते. त्यानंतर त्यांचे पुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर शहरातच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला झाला. शिवसेनेचा मुख्य बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे जिल्ह्यातला हा पहिला हल्ला होता. यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ माजी नगरसेवक धनंजय बोडारे आणि बहुतांश शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपण शिवसेनेत आणि ठाकरे कुटुंबियांसोबतच असल्याचे स्पष्ट केले होते.

दुसरीकडे शिंदे समर्थक अरुण आशान यांच्यासह सागर उंटवाल, नाना बागुल यांनी उल्हासनगर शहरात शिंदे गटासाठी मोर्चेबांधणी सुरु केली होती. अखेर बुधवारी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील आनंदाश्रम येथील आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उल्हासनगरातील १५ माजी नगरसेवकांनी भेट घेत आपला त्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

यावेळी उल्हासनगर महापालिकेतील ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, चरणजितकौर भुल्लर, कुलविंदरसिंह सोहोता, स्वप्निल बागूल, पुष्पा बागुल, माजी महापौर लिलाबाई आशान, विकास पाटील यांच्यासह १५ माजी नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती माजी स्विकृत नगरसेवक अरूण आशान यांनी दिली आहे. या गटाच्या शिंदे यांना पाठिंबा देण्याने उल्हासनगर शिवसेनेत मोठी फुट दिसून आली आहे. उल्हासनगर शिवसेनेचे २५ नगरसेवक होते. त्यातील १५ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले असून येत्या काही दिवसात इतरही अनेक जण येतील, अशी आशा आशान यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक