मुरबाड : मुरबाड तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या सरळगाव जवळील नेवाळपाड्यातील १५० वर्ष जुना ऐतिहासिक झुंजारराव वाड्याला शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत या वाड्यातील ऐतिहासिक वस्तू, किंमती दस्तावेज जळून खाक झाले.
झुंजारराव कुटुंबाच्या मालकीच्या या वाड्यात सध्या कोणी राहत नसल्याने मोठी हानी टळली. मात्र, ऐतिहासिक वारसा असलेला वाडा आगीच्या भक्षस्थानी पडला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून वणव्यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.