भाईंदर : मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वर्ष २०२४ मध्ये ४४० जणांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ३६४ इतकी आहे.
सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीत कौटुंबिक ताणतणाव, प्रेमभंग, नोकरीचा ताण, परिक्षेची भिती, त्यात आलेले अपयश, आत्महत्त्येचे विचार मनात येणे, झोप न लागणे, झोप कमी होणे, सतत भिती वाटणे, घाबरणे, नैराश्य यातून मानसीक समस्यांना सामोरे जाण्याचे प्रमाण वाढले आहे .
त्यातूनच बदनामीच्या भीतीने, एकतर्फी वा प्रेमप्रकरणातील अपयश, मनासारखे न होणे, अपमानित वा कमीपणाची भावना निर्माण होणे, शिक्षणातील अपयश, शोषण, आर्थिक संकट वा कर्ज, व्याधीने त्रस्त असणे, बेरोजगारी, नैराश्य, रागाच्या भरात आदी कारणांनी आत्महत्या केल्या जातात.
२०२४ या वर्षात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात ४४० जणांनी आत्महत्या केली. त्यात गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या तब्बल ३६४ इतकी आहे. तर विष पिऊन २७ जणांनी, उंचीवरून उडी मारून ९ जणांनी, औषध पिऊन ५ जणांनी , पाण्यात बुडून ४ जणांनी तर नस कापून व स्वतः जाळून घेऊन प्रत्येकी १ जणांनी स्वतःचे आयुष्य संपवले आहे .
आयुक्तालयातील वर्षभरातील आत्महत्यांची माहिती आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकारी योगिता बाविस्कर यांनी दिली आहे . सौम्य किंवा मध्यम स्वरुपाचा मानसीक आजार तीव्र स्वरुपात वाढू नये किंवा आत्महत्येपर्यंत जाऊ नये यासाठी टोकाचे पाऊल उचलण्याआधी समुपदेशकांशी किंवा मानसिक रोगतज्ज्ञ यांच्याकडे व्यक्त व्हाल तर जीव वाचू शकतो.
मानसिक स्वास्थ्य संतुलित राखण्यास व तणाव कमी करण्यासाठी छंद आणि मनोरंजक क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहिले पाहिजे. खेळसुद्धा आपल्याला जीवनातील यश आणि अपयश पचवायला शिकवतात व जीवनात नवी उभारी देण्यास मदत करतात. जर तुम्हाला तणाव किंवा भीतीमुळे अत्यंत टोकाचे विचार येत असतील, तर या भावना व्यवस्थापित करण्यासाठी पावले उचलणे आणि आवश्यक असल्यास मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणे महत्त्वाचे आहे असे जाणकार सांगतात .
नैराश्य, आत्महत्या टाळता याव्यात ह्यासाठी शासनाची ‘टेलि मानस’ ही विनामूल्य सुविधा सुरू आहे . त्यासाठी १४४१६ हा टोल फ्री क्रमांक आहे. सकाळी ८ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री ८ आणि रात्री ८ ते सकाळी ८ अशा तीन पाळ्यां मध्ये हे समुपदेशक उपलब्ध असतात.