लग्नाच्या अवघ्या ४८ दिवसांतच २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमधून समोर आली आहे. घराच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही लावून मृत महिलेवर तिच्या पतीद्वारे पाळत ठेवली जात होती. शिवाय, हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि मानसिक त्रासही दिला जात होता, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा तिळकर असे मृत महिलेचे नाव असून मंगळवारी तिने सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाखा आणि डॉ. नितीन तिळकर यांचा विवाह ३० एप्रिल रोजी झाला होता. लग्नापूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये संबंध चांगले होते.पण लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्यांकडून (डॉक्टर पती, सासू आणि दीर ) विशाखाचा मानसिक, शारीरिक छळ सुरू झाला. लग्नात मिळालेल्या भेटवस्तू आणि दागिन्यांबाबत नाराजी व्यक्त करत आरोपींकडून विशाखाच्या आई-वडिलांकडे अजून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची मागणी केली जात होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
घरात लावले होते CCTV कॅमेरे
विशाखाच्या कुटुंबीयांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पतीने घराच्या आत आणि बाहेर CCTV कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तिच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात होते. शेजाऱ्यांशी साधं बोललं तरी तिची चौकशी केली जात होती, काही वेळा मारहाणही केली जात होती, असा आरोप करण्यात आला आहे. आत्महत्येच्या दोन दिवस आधी विशाखाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी संवाद साधल्याच्या कारणावरून पतीने तिला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
माहेरी आणायच्या आधीच उचललं टोकाचं पाऊल
नातेवाईकांच्या माहितीनुसार, विशाखाने आपल्या आईला फोनवरून होत असलेल्या छळाबाबत माहिती दिली होती. ती मानसिक तणावात असल्याचेही तिने सांगितले होते. कुटुंबीय तिला माहेरी आणण्याच्या तयारीतही होते. मात्र, त्यापूर्वीच मंगळवारी तिच्या मृत्यूची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली.
तिघेही आरोपी अटकेत
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी पती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात घरात CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच पती पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याची माहितीही आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार डॉ. नितीन तिळकर, सासू छाया तिळकर आणि दीर निनाद तिळकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.