बदलापूरः बदलापूरपासून सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या आंबेशिव गावात बिबट्याने दोन बकऱ्यांची शिकार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर वन विभाग ॲॅक्शन मोडवर आला असून नागरिकांमध्ये जनजागृती करतानाच बिबट्याच्या शोध घेण्यासाठी वनविभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यातील जंगल भागात अनेकदा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. शेजारी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून अनेकदा माळशेजमार्गे बिबटे या मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात आल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी जुन्नरमध्ये रेडिओ कॉलर लावलेला एक बिबट्या अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात अनेक महिने फेरफटका मारताना दिसला होता. त्यानंतर अंबरनाथच्या उल्हास नदी लगतच्या वसत शेलवली, तीन झाडी परिसरात, बदलापुरजवळील बारवी नदी जवळील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला. मलंगगड, चंदेरीच्या डोंगररांगांमध्येही बिबट्या अनेकदा बिबट्या आढळून आला होता.
शेणाच्या गोवऱ्यांमध्ये आढळल्या बिबट्याच्या पाऊलखुणा
आता बिबट्याने पुन्हा एकदा अंबरनाथ तालुक्यातील एका गावात एन्ट्री केली आहे. बदलापूर शहराला लागून असलेल्या आंबेशीव गावात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने या गावातील एका शेतकऱ्याच्या दोन बकऱ्यांची शिकार केली होती. बकरीच्या शवविच्छेदन अहवालात बिबट्याने बकरीवर हल्ला केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी सकाळी गावातील एका शेतकऱ्याच्या घरामागे शेणाच्या गोवऱ्यांमध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्याशिवाय काही ग्रामस्थांना बिबट्या आढळून आल्याची माहिती वनविभागाला दिली. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाच्या टीमने गावात तळ ठोकला आहे. प्राथमिक स्वरूपाचे कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले असून बिबट्याच्या पाऊलखुणा आढळलेल्या भागात कॅमेरे बसवून बिबट्यावर नजर ठेवली जाणार आहे. सुरुवातीला फटाक्यांचा आवाज करून व इतर उपाययोजना करून त्याला नैसर्गिक अधिवासात नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
त्यांचा प्रवास नैसर्गिक
बिबट्यांचा वावर हा या परिसरात आहेच. हा त्याचा अधिवास आहे. बारवी, उल्हास नदीच्या परिसरात यापूर्वीही बिबटे आलेले आहेत. ते मार्गक्रमण करत असताना कधीकधी ते मानवी वस्तीजवळ पोहोचत असतात. त्यामुळे हा त्याचा नैसर्गिक प्रवास आहे, असे मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांनी सांगितले.