बदलापूर : बदलापुरात शालेय विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणाला दोन वर्ष उलटले असताना, आता एका प्री-स्कूलमध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीचे स्कूल व्हॅनचालकाकडून लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समजताच बदलापुरात संतापाचे वातावरण पसरले आणि जमावाने व्हॅनच्या काचा फोडल्या. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खबरदारी म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकावर दंगल नियंत्रण पथक आणि आरपीएफचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपीला पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्याला आज न्यायालयात हजर केले जाईल.
बदलापूर पश्चिम भागातील एका प्री-स्कूलमध्ये शिकणारी चार वर्षीय विद्यार्थिनी गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. दररोज दुपारी दीडच्या सुमारास स्कूल व्हॅनने ती घरी यायची, मात्र गुरुवारी ती वेळेवर घरी पोहोचली नाही. मुलीच्या आईने तीन-चार वेळा व्हॅन चालकाला कॉल केला. अखेरीस दुपारी अडीचच्या सुमारास मुलगी घरी पोहोचली, मात्र ती प्रचंड घाबरलेली होती. आईने मुलीला विचारले असता, तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. याबाबत मुलीच्या आईने वडिलांना त्वरित कळवले, तेही लगेच घरी पोहोचले. नंतर आई-वडिल आणि त्यांच्या शेजारी लोकांनी शाळेत जाऊन घटना समजावून सांगितली. मात्र शाळेकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले की, पोलिसांच्या एका पथकाने तात्काळ आरोपीच्या घरी जाऊन त्याला पोलीस ठाण्यात आणले आणि गुरुवारी रात्री अटक केली. "त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल," असे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष प्रियांका दामले आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी केली आणि कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, असेही बजावले. यापूर्वी बदलापुरात समोर आलेल्या शालेय विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणानंतर संतप्त स्थानिकांनी ९ तास रेल्वे रोको केला होता. तो प्रकार टाळण्यासाठी यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बदलापुरातील या शाळेत महिला अटेंडंट का नव्हती, आणि शाळा व्यवस्थापन व शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का केले, याची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.